शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. शिंदे गट आणि भाजपाचं सरकार म्हणजे नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. असं असताना आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर, भाजपाच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली होती. असं असताना देखील भाजपा नेते निलेश राणे हे सातत्याने ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. यावरून आता निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा- “काँग्रेसने स्वाभिमान केव्हाच गहाण टाकलाय”, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका

दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत, हे विसरू नका. अलायन्स टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदार संघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला आहे.

हेही वाचा- “धनुष्यबाण शिंदे गटाला द्यावं आणि…” शिवसेनेच्या अंतर्गत वादात रामदास आठवले यांची उडी

याबाबत स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले की, “त्यांची लायकी काय आहे? हे सात वर्षापूर्वी कोकणातील जनतेनं त्यांना दाखवून दिली आहे. ते अजून विसरले नसतील. नाहीतर कोकणातील जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल. आमचं ठरलं आहे की, भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलू नये. पण ते सारखं-सारखं ट्वीट करत होते, त्यामुळे मी त्यांना लहान म्हटलं. त्यांच्या वयानुसार मी त्यांना लहान म्हटलं, कारण ते माझ्या वयापेक्षा निम्म्या वयाचे आहेत. त्यांना लहान म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण त्यांचं वयच लहान आहे. तो वडीलकीचा माझा मान आहे. त्यांना वडीलकीचा मान ठेवायचा नसेल; तर ती त्यांची संस्कृती झाली. आमची संस्कृती वडिलधाऱ्या लोकांचा मान ठेवणं ही आहे,” असं केसरकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute between shinde fadnavis government nilesh rane and deepak kesarkar criticize each other rmm