लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे वादग्रस्त नेते, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि त्यांचे सख्खे बंधू तथा पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. माढा येथे प्रा. शिवाजी सावंत यांनी आयोजिलेल्या शिवमेळाव्यात व्यासपीठावरील भल्या मोठ्या फलकावर डॉ. तानाजी सावंत यांची छबी गायब झाल्याचे दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे या शिव मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला.

डॉ. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत हे माढा तालुक्यातील वाकाव येथील राहणारे आहेत. सावंत बंधूंच्या मालकीच्या भैरवनाथ साखर कारखान्याची शाखा माढा तालुक्यातही आहे. आतापर्यंत दोघा बंधूंमध्ये सख्य होते. विशेषतः डॉ. तानाजी सावंत हे मंत्री असताना बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचा माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दबदबा होता.

तथापि, महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात डॉ. तानाजी सावंत यांना स्थान मिळाले नाही. वादग्रस्त नेते आणि मंत्री म्हणून त्यांचे नाव अधूनमधून चर्चेत येत होते. अलीकडे त्यांचा मुलगा पुण्यातून अचानकपणे विमानाने थायलंडला जात असताना डॉ. तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून मुलाचे विमान सरकारमार्फत परत फिरविले होते. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

या पार्श्वभूमीवर त्यांचे कनिष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा येथे आपले चिरंजीव ऋतुराज सावंत यांच्या माध्यमातून राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीज लि. कारखाना उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचे भूमिपूजन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरविण्यात आले होते. या कार्यक्रमाला जोडून शिवमेळावाही आयोजिला होता. या शिवमेळाव्यास उपस्थित राहणारे म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच शिवसेना व भाजपाच्या आजी-माजी आमदारांसह इतर नेत्यांच्या छबी असलेल्या कार्यक्रमाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या होत्या. परंतु या जाहिरातींमध्ये कोठेही डॉ. तानाजी सावंत यांना स्थान नव्हते.

तब्बल ८० लहान-मोठ्या नेत्यांच्या छबी जाहिरातीमध्ये झळकल्या असताना त्यात सख्खे बंधू डॉ. तानाजी सावंत यांच्या नावासह त्यांची छबी दिसली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रा. शिवाजी सावंत हे महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखले जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून इच्छुक होते.

दरम्यान, या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द झाला. त्यांच्या अनुपस्थितीत राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीज लि. कारखान्याचे भूमिपूजन आणि शिवमेळावा उरकण्यात आला.

शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी…

माढ्यात प्रा. शिवाजी सावंत व कुटुंबीयांच्या राजवी अग्रो ऑइल इंडस्ट्रीज कारखान्याचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाले. महायुती सरकार प्रा. शिवाजी सावंत व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा उदय सामंत यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आगामी काळात पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी पक्षासाठी दररोज दोन तास द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.