विश्वास पवार

सातारा पालिकेतील अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांत अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पालिकेत सध्या उदयनराजेंच्या आघाडीची सत्ता असल्याने अनेक सुप्त विरोधक एकत्र येत या भ्रष्टाचार प्रकरणावरून सातारा नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह उदयनराजेंनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

पालिकेत उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव व अन्य एकाला घंटा गाडीच्या ठेकेदारीची १५ लाख रुपयांची अनामत रक्कम परत करण्यासाठी दोन लाख ३० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पालिकेत मागील साडेतीन वर्षांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. यावेळी थेट नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे उदयनराजेच्या आघाडीच्या उमेदवार माधवी कदम यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. उदयनराजेंकडून शहराच्या खूप अपेक्षा आहेत. उदयनराजेंनी विकासकामे मंजूर करून आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. सध्या ही कामे सुरू आहेत. पालिकेच्या भ्रष्ट्राचाराची चर्चा होत होती तेव्हा उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोघेही राष्ट्रवादीमध्ये होते व तेव्हाही शिवेंद्रसिंहराजे प्रणीत आघाडी व भाजपने या गैरव्यवहारांच्या विरोधात आवाज उठविला होता. आता दोघेही भाजपवासी झाले.

वादाचे कारण काय?

पालिका कार्यालयातच दोन लाख ३० हजाराची लाच घेताना उपमुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षकांना पकडले आणि सातारा पालिकेत अधिकाऱ्यांचे लाचलुचपत प्रकरण उघडकीस आल्याने सातारा पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले. त्यात पालिकेत ठेकेदारांकडून घेतल्या जाणाऱ्या पक्ष निधीचीही शहरात जोरदार चर्चा आहे. यामुळे साताऱ्यात विरोधी आघाडी असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंच्या नगर विकास आघाडीनेही या प्रकरणाबाबत जोरदार आघाडी उघडली.

दीड वर्षांने पालिकेची निवडणूक आहे. नेते जरी भाजपात गेले असले तरी कार्यकर्ते काही मनाने भाजपात गेलेले नाहीत. स्थानिक राजकारणात टोकाचे मतभेद कायम आहेत. ते कधी उफाळून येथील हे सांगता येत नाही.

सातारा नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार प्रकरण बाहेर आले हे एक हिमनगाचे टोक आहे. हा साताऱ्यातील नगरसेवकांपासून ते नगराध्यक्षापर्यंत पालिकेचा कारभार बघितला तर या कारभारावर कोणाचा वचक नाही हे स्पष्ट होते. या दोन्ही राजांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे, नाही तर सातारकर या राजांना त्यांची जागा दाखवतील.

-नरेंद्र पाटील, शिवसेना नेते

लाचखोरांवर कठोर कारवाई करावी. संचालनालयाने संचित धुमाळ याची थेट नियुक्ती केली होती. बाहेरगावहून आलेल्या अधिकाऱ्यांना शहराविषयी आपुलकी व बांधिलकी कमी असते. त्यामुळे असे अधिकारी चुकीचे काम करतात. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु यामध्ये निष्पाप लोकांवर अन्याय होऊ नये. मागील साडेतीन वर्षांत शहरात सत्ताधाऱ्यांनी अनेक विकास प्रकल्प राबविले आहेत. या घडलेल्या प्रकारचे कोणी राजकारण करू नये. हा प्रकार अक्षम्य असाच आहे.

-माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा

सातारा पालिकेत अधिकाऱ्यांचे लाचलुचपत प्रकरण उघडकीस आल्याने सातारा पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा पालिका ही सातारकरांची नव्हे तर, मनमानी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. हे आत्ताच नाही अनेकदा सिद्ध झाले आहे. सातारकरांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. पालिके च्या चार अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. हे कशाचे द्योतक आहे.  गेल्या साडेतीन वर्षांपासून सातारा पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सत्ताधारी अंतर्गत गटबाजी, गटतट यामध्येच अडकून पडले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.

– अमोल मोहिते, पक्षप्रतोद, नगर विकास आघाडी, सातारा (शिवेन्द्रसिंहराजे भोसले प्रणीत)

सातारा पालिकेत आजही उदयनराजे प्रणीत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक असून ते विरोधी बाकावर बसतात. तर शिवेंन्द्रसिंहराजे प्रणीत नगर विकास आघाडीही विरोधी आघाडी आहे. उदयनराजे व शिवेंन्द्रसिंहराजे यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी त्या दोघांच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे पालिकेतील कामकाजाशी भाजपाचा काही सबंध नाही.

– विठ्ठल बलशेटवार, सरचिटणीस, भाजपा, सातारा

Story img Loader