केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने गुरूवारी आयोजित आंदोलनात शहराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्यातच वाद उफाळून आल्याने आंदोलन राहिले बाजूला आणि हा वादच हातघाईवर आल्याची स्थिती निर्माण झाली. या वादास आगामी शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीची किनार असून घडलेल्या प्रकारानंतर पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करत उलट माध्यमांवरच तोंडसुख घेतले.
सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. याच आंदोलनात शरद सानप हेही उपस्थित झाले आणि शहराध्यक्षांशी वाद-विवादास सुरूवात झाली. आंदोलनस्थळी प्रा. सुहास फरांदे यांनी बोलविल्याचे सांगून सानप यांनी शहराध्यक्षांना खडे बोल सुनावले. महापालिका निवडणुकीत आपणास तिकीट दिले नसल्यावरून त्यांनी रोष प्रगट केला. त्यास शहराध्यक्षांनी चोख प्रत्यूत्तर दिले. यावेळी अर्वाच्च भाषेचा प्रयोग करताना कार्यकर्ते परस्परांच्या अंगावर धावून गेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने आंदोलन स्थळाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. या वादाची माहिती सर्वदूर पोहोचल्यानंतर मात्र पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत असा वादच झाला नसल्याची भूमिका घेतली. ज्या पदाधिकाऱ्याने सानप यांना निमंत्रण दिले, तो देखील शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना जमवून शहराध्यक्षपदाचे समीकरण जुळविण्याच्या त्यांचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
या वादाचे वार्ताकन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले. पत्रकारांना भांडणे लावण्यात अधिक रस आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आंदोलनातील या घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या विद्यमान शहराध्यक्षांशी संबंधितांचा वाद झाल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.
या संदर्भात सावजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. कुणा पदाधिकाऱ्याच्या निमंत्रणावरून सार्वजनिक ठिकाणी कोणी कोणालाही बोलावू शकतो, असेही ते म्हणाले. या वादास शहराध्यक्ष निवडणुकीचाही संदर्भ नसल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनाचा विषय राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेले विधान केवळ राजकीय राळ उडविण्यासाठी केले आहे. देशात महागाई, सीमेवरील घुसखोरी, दरोडे, बलात्कार अशा सर्वच समस्या सोडविण्यात काँग्रेसला अपयश आले आहे.

Story img Loader