रत्नागिरी नगर परिषदेत भाजपा-सेना युतीचे स्पष्ट बहुमत असूनही या दोन पक्षांमधील पदांच्या वाटणीमुळे शहराच्या विकासाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सुमारे सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजप-सेना युतीने काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडवत २८ जागांपैकी २१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. पण दोन्ही बाजूच्या जास्तीत जास्त सदस्यांचे पदाधिकारी म्हणून नाव लागावे या संकुचित हेतूपायी एकूण पाच वर्षांच्या कार्यकालापैकी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी सव्वा वर्षांचे चार कालावधी करण्याचा आणि त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपापले सदस्य या पदांवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या या दोन पदांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मिलिंद कीर, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे महेंद्र मयेकर यांची निवड झाली. करारानुसार या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यानुसार मयेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेचे बंडय़ा साळवी यांची या पदावर नुकतीच बिनविरोध निवड झाली, पण त्यापूर्वी त्यांना पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावेच लागले. त्या निमित्ताने शिवसेनेतही आता एकछत्री अंमल संपुष्टात आल्याचे उघड झाले.
करारानुसार नगराध्यक्ष कीर यांनी मात्र अजून राजीनामा दिलेला नाही, पण उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे आता त्यांनाही पायउतार होणे भाग पडणार आहे. अशा प्रकारे केवळ आपल्या कार्यकर्त्यांची पदांवर वर्णी लावण्याच्या दोन्ही पक्षांच्या अट्टहासामुळे मावळत्या नगराध्यक्षांनी योजनापूर्वक हाती घेतलेले उपक्रम भावी काळात मागे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषत: शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता, छोटी-मोठी अतिक्रमणे इत्यादी बाबींकडे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले होते. तसे करताना काही जुन्या-जाणत्या मातब्बरांच्या बालेकिल्ल्यांनाही त्यांनी धक्केदिले. मात्र सव्वा वर्षांच्या मर्यादित कालावधीमुळे कोणत्याच योजना पूर्णत्वाला जाऊ शकलेल्या नाहीत. निवडणुकीपूर्वी ठरलेल्या जागा वाटपाच्या धोरणानुसार आता भाजपच्या सदस्याला नगराध्यक्षपद मिळणार आहे. सध्या ही जागा खुल्या गटासाठी असल्यामुळे त्यासाठी स्पध्रेत असलेल्यांपैकी काहींचे सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध आहेत. ते हितसंबंध पुनरुज्जीवित झाले तर त्यामुळे शहराच्या बकालपणामध्ये भर पडण्याचीच शक्यता दिसत आहे.

Story img Loader