रत्नागिरीतील साळवी बसथांब्यालगत असलेल्या शिवसेना शाखेवर ताबा सांगण्यावरुन दोन शिवसेनांमध्ये आता जुंपली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख प्रदिप (बंड्या) साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या शाखेच्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र या शाखेवर दोन्ही शिवसेनांनी दावा केल्याने आता हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी शहरातील साळवी बस थांब्याजवळ असणारी शिवसेनेची शाखा न्याय देणारे मंदीर म्हणून ओळखली जाते. शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या या शाखेवर आता शिंदे गटाच्या शिवसेनेने ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या शाखेवरुन वादाला तोंड फुटले आहे. बंड्या साळवी यांच्या राजिनाम्यानंतर ठाकरे गटाने शेखर घोसाळे यांची तालुकाप्रमुख म्हणून नेमणूक केली. या नेमणुकीनंतर घोसाळे यांनी साळवी बस थांब्याजवळील शिवसेना शाखा ठाकरे गटाची असल्याचे सांगून त्यावर दावा केला आहे. आता या शाखेवरुन दोन्ही शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

साळवी बस थांब्याजवळील शिवसेना शाखा ही न्याय मंदिर आहे. उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळेही तेथे येऊ शकतात. असे बंड्या साळवी यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाव तेथे शाखा सुरु केली. लोकांना न्याय मिळावा म्हणून या शाखा गावागावात सुरु झाल्या आणि आम्ही तेच काम करत आहोत. ज्यांनी येथे शिवसेना शाखा बांधली ते आता हयात नाहीत. उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे हे आमचे मित्र आहेत. आणि ते जरी या शाखेत आले तरी त्यांचे स्वागत आहे, असे बंड्या साळवी यांनी सांगितले. मात्र या शाखेत आपण नेहमीप्रमाणे रोज बसणार असल्याचेही शिंदे गटाचे बंड्या साळवी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over branch between two shivsena in ratnagiri ssb