लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : आजारी वडिलांवर वैद्यकीय उपचार कोणत्या रुग्णालयात करायचा, यावरून घरात झालेल्या वादाचे पर्यवसान नातवाने आजीच्या केलेल्या हत्येत झाले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावात ही धक्कादायक घटना घडली.
निर्मला संतराव सुरवसे (वय ७०) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा नातू सुमीत सदाशिव सुरवसे याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. मृत निर्मला यांचे पती संतराम विठ्ठल सुरवसे (वय ७५) यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा सदाशिव हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. आजार वाढत असताना त्याच्यावर कोणत्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार करायचे, यावरून घरात वाद सुरू होता.
आणखी वाचा-उत्तम जानकर यांच्यावर मारकडवाडी प्रकरणी गुन्हा
नातू सुमीत याने वैद्यकीय उपचारासाठी सुचविलेल्या दवाखान्यात मुलगा सदाशिव यास नेण्यास आजी निर्मला सुरवसे यांचा विरोध होता. त्यांनी दुसऱ्या दवाखान्याचे नाव सुचविले होते. परंतु, त्याच कारणावरून झालेल्या भांडणात नातू सुमीत याने आजी निर्मला यांना मारहाण केली. त्या वेळी घरात अन्य कोणीही नव्हते. डोक्यात दगड घालून आणि मानेवर कुऱ्हाडीने प्रहार करून नातू सुमीत याने आजीचा निर्घृण खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुमीतला अटक करून अक्कलकोटच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, त्यास तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.