विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेषत राष्ट्रवादीत सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अंतर्गत सुरू असलेले साठमारीचे राजकारण तापत आहे, तर दुसरीकडे भाजप-सेना युतीत सन्नाटा दिसून येतो.
सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या जागेवरून या पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. ही संधी पुनश्च मिळावी म्हणून आमदार साळुखे हे प्रयत्नशील आहेत. याशिवाय मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचेही नाव चच्रेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेलेले आणि करमाळा मतदारसंघातून स्वाभिमानीचा झेंडा हाती घेऊन अयशस्वी लढत दिलेले माढ्याचे संजय िशदे हे सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीसाठी संधी मिळणार असेल तर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. संजय िशदे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील गटाला शह देणारे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जात. आता त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत पावन करून विधान परिषदेवर संधी देण्यास मोहिते-पाटील यांचा जोरदार विरोध होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्या विरोधात संजय िशदे यांच्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारवाया सुरूच आहेत.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीकडे असली,तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतदार काँग्रेसचे आहेत.एकूण ४९८ मतदारांपकी सर्वाधिक १७८ मतदार काँग्रेसचे आहेत. तर राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या ९२ इतकी मर्यादित आहे. भाजप-३९, शिवसेना-२१, शेकाप-१५, आघाडी-१४, अपक्ष-२७ व इतर पक्ष-१२ याप्रमाणे मतदारनिहाय पक्षीय बलाबल आहे.
कोटीच्या कोटी उड्डाणे करण्याची पाश्र्वभूमी पाहता या निवडणुकीच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वपक्षीय मतदारांच्या नजरा वळल्या आहेत. दीपावलीनंतर येणारी मकर संक्रांत दीपावलीप्रमाणेच धडाक्यात साजरी व्हावी आणि अर्थातच ‘लक्ष्मी दर्शन’ व्हावे यासाठी बहुसंख्य मतदार आतुरतेने निवडणुकीची प्रतीक्षा करीत आहेत. मतदारांच्या वाढीव संख्येचा दावा करीत राष्ट्रवादीकडून सोलापूरची ही जागा सोडवून घेण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांनी मोच्रेबांधणी चालविली आहे. अर्थात त्यांची भिस्त काँग्रेसचे नेते सुशीलकुमार िशदे व डॉ. पतंगराव कदम यांच्यावर आहे. सुशीलकुमार िशदे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेले गुरूशिष्याचे नाते विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीकडून सोडवून घेणे अशक्य समजले जात आहे. आपल्या ताब्यातील ही जागा सोडण्यास राष्ट्रवादी अजिबात राजी दिसत नाही. काँग्रेसकडून इच्छूक दिलीप माने ही बडी आसामी समजली जाते. सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, राज्यातील अग्रेसर अशा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक, दोन खासगी साखर कारखाने, अभियांत्रिकी महाविद्यालय असे सत्ताकारणाचे जाळे त्यांच्याकडे आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडूनही आले होते. त्यांच्या स्थायीभावात बंडखोरीचे वडिलोपार्जति गुण आहेत. दिवंगत नेते ब्रह्मदेव माने हे यापूर्वी १९८६ साली विधान परिषदेच्या याच सोलापूर स्थानिक मतदारसंघातून शरद पवार यांच्या तत्कालीन पुलोदचे रंगलाल तोष्णीवाल यांना धूळ चारून काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यावेळी शरद पवार यांना धक्का बसला होता. दिलीप माने हे वडिलांचा वारसा चालवत राष्ट्रवादीच्या विरोधात आघाडीचा धर्म बाजूला ठेवून बंडखोरी करणार का, त्यांनी बंड केल्यास राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीचा लाभ मिळणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा