‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असा प्रकार पाणी चोरी रोखण्याकरिता गेलेल्या लष्करी जवानांच्या बाबतीत घडल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची घटना मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण परिसरात घडली. गैरसमजातून लष्करी जवानांनी धरणातून ज्यांनी ज्यांनी कृषीपंपाद्वारे पाणी घेतले, त्यांच्या जलवाहिन्या उखडून टाकल्याने ‘जवान’ आणि ‘किसान’ यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची स्थिती सायंकाळी उशिरा निर्माण झाली.  
   लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे प्रकरण निस्तरण्यासाठी घटनास्थळी धाव घ्यावी लागली. वास्तविक, लष्करी परिसरास ज्या भागातून पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणची पाणी चोरी रोखण्यास अधिकाऱ्यांनी जवानांना बजावले होते. परंतु हे ठिकाण सोडून ते थेट धरण परिसरात पोहोचल्याने हा गोंधळ उडाल्याची बाब वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मान्य केली.
शहरालगतच्या देवळाली कॅम्प परिसरात लष्कराचे केंद्र आहे. त्या अंतर्गत तोफखाना केंद्र आणि तोफखाना स्कूल तसेच आर्मी एव्हिएशन स्कूल आदींचा समावेश असून, या केंद्राला भगूरमधून वाहणाऱ्या दारणा नदीलगतच्या देवळाली पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातून स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने लष्करी केंद्रातील हजारो जवान व कुटुंबीयांना पाणी मिळणे अवघड झाले.
या बाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी जवानांचे पथक ही चोरी रोखण्यासाठी रवाना केले खरे, पण घडले भलतेच. जवानांच्या पथकाने अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरील देवळाली पंपिंग स्टेशनवर न जाता थेट १५ ते २० किलोमीटर अंतरावरील दारणा धरण गाठले.
या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रीतसर परवानगीने पाणी घेतले आहे. आपल्या पाण्याची याच भागातून चोरी होत असल्याचा समज झाल्याने जवानांनी काही एक विचार न करता समोर दिसेल, त्या जलवाहिन्या उखडून टाकण्यास सुरुवात केली. अशा उखडलेल्या जलवाहिन्यांची संख्या सुमारे २०० असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. काही वेळातच या प्रकाराची माहिती सर्वदूर पसरली आणि २०० पेक्षा अधिक ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी लष्करी जवानांची वाहने तीन तासांहून अधिक काळ रोखून धरली. कोणतेही कारण नसताना उद्ध्वस्त केलेल्या जलवाहिन्यांची भरपाई दिल्याशिवाय जवानांना जाऊ दिले जाणार नसल्याची भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतल्याने बिकट स्थिती निर्माण झाली.
या संदर्भात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जवानांकडून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे मान्य केले. या जवानांना देवळाली पंपिंग स्टेशन परिसरातील पाणी चोरी थांबविण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, ते दारणा धरणावर कसे पोहोचले, याचे आम्हालाच आश्चर्य वाटते. जवानांकडून चूक झाली असून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान भरून दिले जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’कडे स्पष्ट केले.

Story img Loader