जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत घरकुल या वादग्रस्त ठरलेल्या योजनेतील घरकुलांचे वाटप लाभार्थी निश्चित करून १३ मार्च २०१३ पूर्वी टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दिले. या विषयावर दाखल झालेल्या लक्षवेधीवर प्रदीर्घ काळ चर्चा झाली असली तरी घरकुल घोटाळ्यातील चौकशीबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याविषयीच्या लक्षवेधीवर मागील सर्वसाधारण सभेवेळी अपूर्ण राहिलेली चर्चा शुक्रवारी महासभेत सुरू झाली. नगरसेवक सुदाम कोंबडे व दिनकर पाटील यांनी ही लक्षवेधी दाखल केली होती. केंद्र सरकारकडून कोटय़वधीचे अनुदान मिळूनही ही योजना महापालिकेने योग्य पद्धतीने राबविली नाही. त्यात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला असून या योजनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी कोंबडे यांनी केली होती. सर्वसाधारण सभेत या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
घरकुल योजनेतील अनागोंदींवर सदस्यांनी या वेळी जोरदार ताशेरे ओढले. कोटय़वधीचा निधी खर्च होऊनही आजतागायत लाभार्थ्यांची निश्चिती होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी जागा निवडताना घोळ घालण्यात आला. पुढेही हीच परंपरा कायम राहिली. परिणामी, झोपडपट्टी निर्मूलनासाठी त्या योजनेचा कोणताही लाभ झाला नाही. उलट, या योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. या विषयावर प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर महापौरांनी जेवढी घरे तयार असतील, त्यांचे १३ मार्चपूर्वी वाटप करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी लाभार्थ्यांची निश्चिती करावी लागणार आहे. सदस्यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सभेत इतर विषय चर्चेला होते. रात्री उशिरापर्यंत त्यावर चर्चा सुरू होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा