औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यामातून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील, असं बोललं जात आहे. याच सभेसाठी लोकांना पैसे देऊन आणलं जात असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांच्यावर केला जात आहे. सभेला येणाऱ्या लोकांना २५० ते ३०० रुपये देण्यात येत असल्याची चर्चा आहे. याबाबत संभाषण करतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित ऑडिओ क्लिप विरोधकांनीच बनवली असून त्यांनीच व्हायरल केली आहे. हे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडून रचण्यात आलं आहे, असे आरोप भुमरे यांनी केले आहेत. मी याबाबत तक्रार करणार असून ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेणार आहे, असंही भुमरे यावेळी म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
हेही वाचा- काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर नितीन गडकरींचं स्पष्ट विधान, म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवर भाष्य करताना भुमरे म्हणाले की, सभेची पूर्ण तयारी झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं सर्व ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. यापूर्वी संदीपान भुमरेंच्या सभेला काहीच गर्दी नव्हती, असं म्हणणाऱ्यांनी आज पैठणला यावं आणि बघावं तालुका कुणाच्या पाठीशी आहे. आजची सभा रेकॉर्डब्रेक सभा ठरणार आहे. पैठण शहरातील सर्वात मोठ्या मैदानात लोकांना बसायला जागा मिळणार नाही, एवढे लोक या सभेला येतील. आदित्य ठाकरेंनी पैठण मतदारसंघात येऊन सभा घेतल्याने आपण या सभेचं आयोजन केलं नाही किंवा गर्दी जमा केली नाही. आधीपासूनच येथील लोकं माझ्या पाठीशी आहेत.
हेही वाचा- “…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपबाबत विचारलं असता, संदीपान भुमरे म्हणाले की, जी क्लिप व्हायरल होत आहे, ती क्लिप विरोधकांनीच तयार केली आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी शिवाय दुसरं कुणीही ही क्लिप तयार करू शकत नाही. आम्ही कुणालाही पैसे दिले नाहीत. हा तालुका आमच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे. तुम्हाला कल्पना असेल गेल्या ३५ वर्षापासून मी या तालुक्याचं नेतृत्व केलं आहे, ते कायम माझ्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही क्लिप व्हायरल करू द्या. क्लिपमधील संभाषण त्यांनीच केलं असून ती क्लिपही त्यांनीच व्हायरल केली आहे. येथे कुणालाही एक रुपयाही द्यायची गरज नाही. आमचे कार्यकर्ते स्वत:च्या वाहनाने पैठणला येत आहेत. याबाबत मी तक्रार करणार असून क्लिप व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेणार आहे, असंही भुमरे म्हणाले.