अलिबाग : राज्य सरकारमार्फत प्रगतीशील शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरणच झालेले नाही. त्यामुळे पुरस्कार जाहीर झालेले शेतकरी पुरस्कारांपासून वंचित राहीले आहे.
शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन अन्य शेतकर्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकर्यांचा राज्य कृषी विभागाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी जिल्हा कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात येतात. या प्रस्तावांचे अवलोकन करून प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांची फक्त घोषणा झाली आहे. प्रत्यक्षात पुरस्कारांचे वितरण अद्याप झालेले नाही.
दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून राज्य सरकार मोठ्या उत्साहात साजरा करते. या दिवसाचे औचित्य साधून भाजीपाला-फलोत्पादन आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यातील शेतकर्यांना राज्य सरकार विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरव केला जात असतो. दरम्यान कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यास मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.
कृषी, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकर्यांना पुरस्कार देण्यासाठी सन २०२० ते २०२२ पर्यंतच्या पुरस्कारार्थींची यादी तयार करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे २३ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रक काढून पुरस्कार देण्याची मान्यतादेखील देण्यात आली आहे. परंतु या पुरस्कारांचे वितरण अद्याप झालेले नाही.
रायगड जिल्ह्यातील दहा शेतकर्यांना राज्य सरकारकडून वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कारसह विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात शेतकर्यांना पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. जिल्ह्यातील बळीराजाला या पुरस्काराची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पुरस्कार जाहीर केले जातात. मात्र त्यांचे वितरण होत नाही. पुरस्कारासाठी जर तीन वर्ष वाट पहावी लागत असेल तर त्या पुरस्कारांचे अप्रुप शेतकऱ्यांना राहणार नाही. शासनाने या पुरस्कारांचे वितरण लवकर करावे. – निर्भय म्हात्रे, शेतीनिष्ठ शेतकरी
जिल्हयातील ज्या दहा शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांना पुरस्कार वितरण झाले नसले तरी पुरस्कारांची रक्कम अदा करण्यात आली आहे. आता पुरस्कार वितरणाची औपचारिकता बाकी आहे. हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. पुरस्कारांचे वितरण लवकरच होईल. – वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी