अन्नभेसळ तसेच साफसफाई न ठेवल्याबद्दल नाशिक विभागात ५६ लाख ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी एकटय़ा नगर जिल्हय़ात २५ लाख २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातील १२ लाखांचा दंड दुधातील भेसळीला करण्यात आल्याची माहिती न्यायनिर्णय कक्ष विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी नीलेश खोसे यांनी दिली.
सन २००६च्या अन्नसुरक्षा व मानके कायद्याची सन २०११ पासून राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यात अप्रमाणित, भेसळयुक्त, कमी दर्जाचे, लेबल दोषाचे अन्नपदार्थ उत्पादन विक्री केल्याबद्दल तसेच हॉटेलमध्ये साफसफाईचे नियम व स्वच्छता न बाळगल्याबद्दल दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या विभागासाठी अन्न व औषध विभागाच्या सहआयुक्तांची न्यायनिर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आल्याचे खोसे यांनी सांगितले.
दूधभेसळीत नगर जिल्हा नाशिक विभागात आघाडीवर असून ६९ प्रकरणांपैकी तब्बल ३७ प्रकरणे दूधभेसळीचे आहेत. या व्यावसायिकांना १२ लाखांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण गुन्हे व त्यांना करण्यात आलेल्या दंडाची रक्कम या क्रमाने हा तपशील आहे. पारनेर ७- १ लाख ८० हजार, पाथर्डी २- २ हजार, कर्जत २- ७५ हजार, राहुरी ५- १ लाख ८० हजार, श्रीरामपूर २- ४० हजार, संगमनेर ३- १ लाख ५५ हजार, राहता ३- ८५ हजार, नेवासे १- २० हजार, श्रीगोंदे ६- १ लाख ३५ हजार, कोपरगाव २- ६० हजार आणि नगर तालुका ४- २ लाख ५० हजार.