पंढरपूर : येथील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे यामधील प्रकल्प बाधितांशी थेट चर्चा करणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहा गट तयार केले आहेत. तर बाधितांना १ व २ मे रोजी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बैठकीच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. बाधितांच्या सर्व शंका, किती जागा जाणार, मोबदला किती व कसा मिळणार या सर्वांची माहिती दिली जाणार आहे. सर्व बाधितांना त्याबाबतचे पत्र दिले असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर येथे कॉरिडॉर करून शहराचा विकास आणि सोयीसुविधा देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्व माहिती देऊनच विकास केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने चौफाळा ते महाद्वार घाट या परिसरातील प्राथमिक माहितीनुसार ५७५ बाधित होत आहेत. यातील काही जणांचा गट तयार केला आहे. त्या गटातील बाधितांना पत्र व त्यामध्ये किती वाजता बोलावले आहे त्याची वेळ नमूद केली आहे. असे १ व २ मे रोजी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महविद्यालयात बैठकीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत.या बाबत येथील कर्मवीर महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये किती बाधित होणार आहे याची संख्या, बाधितांचे किती व काय नुकसान होणार आहे. यामध्ये दुकाने, घर याचे किती नुकसान होणार आणि अन्य माहिती या विद्यार्थ्यांमार्फत संकलित केली जाणार आहे. वाराणसी येथील अधिकाऱ्यांचे एक पथक पुढील आठवड्यात पंढरपूरला येणार आहे. तसेच शहरी भूसंपादन कसे केले जाते याचा अभ्यास, माहिती देखील घेतली असून कोणाचेही आर्थिक व अन्य नुकसान न करता आणि विकासात्मक प्रकल्प करणार असल्याची माहिती आशीर्वाद यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या या कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या सर्व बाधितांचे मनोगत, भूमिका जाणून घेऊन त्याबाबतची माहिती सरकारला दिली आहे. आता जिल्हाधिकारी थेट बाधितांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढणार आहेत. त्यामुळे यामध्ये काय होणार याकडे भाविकांसह स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत.