जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांचा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या विद्या निकेतन शाळेच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा कुटिल डाव असून त्यासाठीच शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उदय पाटील यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेने विद्या निकेतन शाळेतील चौथीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा मनसेने या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर जिल्हा काँग्रेसनेही विरोध प्रकट केला आहे.
काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उदय पाटील यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय आताच का घेण्यात आला, याची विचारणा जिल्हा परिषदेकडे केली आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यावर या शाळा बंद निर्णयामुळे काय परिणाम होईल याचा प्रशासनाने विचार केलेला नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. शाळा सुरू ठेवण्याविषयी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेने जिल्हा परिषदेला दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडून तशी परवानगी घेणे आवश्यक होते. सदरची शाळा बंद करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेला नाही. शिक्षण व क्रीडा समितीने ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. काही वर्ग बंद केल्याने पुढील वर्गाना विद्यार्थी मिळणार नाहीत. त्यामुळे आपोआपच शाळा बंद करणे क्रमप्राप्त होईल. शाळा बंद झाली म्हणजे त्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल, असा हा नियोजनबद्ध डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

Story img Loader