प्रशांत देशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : पूर्व विदर्भात शैक्षणिक पैलूने वर्धा जिल्हा समृद्ध मानला जातो. प्रामुख्याने उच्च शिक्षणातील सर्वच शाखांची महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ तसेच दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असल्याने जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र नावलौकिक पाहायला मिळतो. असे असले तरी शालेय स्तरावरील सुविधांच्या बाबतीत जिल्हा अद्याप मागेच आहे.

उच्च माध्यमिक शाळांमध्ये आष्टी, कारंजा, आर्वी, देवळी येथे मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही. मुलांसाठी मात्र सर्वच तालुक्यांत शौचालय आहे. माध्यमिक २३४ शाळांमध्ये शौचालय असून केवळ समुद्रपूर, देवळी, वर्धा या ठिकाणी मुलींसाठी शौचालय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचा अभाव दिसून येतो. अशा शाळा असलेल्या तालुक्यांमध्ये एकाही शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही. तर प्राथमिक शाळांमध्ये अधिकच वाईट स्थिती असल्याचे आकडेवारी आहे. एकूण ९६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कारंजा, आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर येथेच मुलींसाठी शौचालय आहे.

हेही वाचा >>> आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलास आता पुण्यातूनही आव्हान, न्यायालयात जनहित याचिका

शाळाबाह्य विद्यार्थी जास्त

पहिल्या इयत्तेत पटसंख्येवर १० हजार १८ मुलांची तसेच ९ हजार ४८९ मुलींची नोंद झाली. मात्र दहाव्या इयत्तेत ७,८२४ मुलं तर ६४०७ मुलीच पोहोचू शकल्या. पटसंख्येवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण दहावीत लक्षणीय संख्येत कमी झाल्याचे हे चित्र आहे. जिल्ह्यात १५ वर्षांवरील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

शून्य ते पाच वर्षांच्या बालकांचे वजन कमी

शून्य ते पाच वर्षांच्या बालकांचे सरासरी वजन जिल्ह्यात कमी असल्याचे दिसून येते. आष्टी तालुक्यात या वयोगटातील अत्यंत कमी वजन असल्याचे प्रमाण १.९७ टक्के,सर्वसाधारण वजन असल्याचे बालकांचे प्रमाण ८.१५ टक्के आहे. कारंजा तालुक्यात १.९७ व ८.८५, आर्वी तालुक्यात ०.७० व ३.१०, सेलू तालुक्यात ३.२५ व १२.९२, वर्धा तालुक्यात १.४१ व ७.८६, देवळी तालुक्यात २.४१ व ९.४८, हिंगणघाट तालुक्यात १.५५ व ८.६७ तसेच समुद्रपूर तालुक्यात २.५९ व ११.२० टक्के असे आहे. जिल्ह्यात एकूण मध्यम कमी वजनाची बालकांची टक्केवारी ९.२ तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी १.९३ एवढी आहे.

(शुक्रवारच्या अंकात गडचिरोली आणि अकोला जिल्हा निर्देशांक)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District index of maharashtra lack of facilities in schools in wardha district zws
Show comments