अहिल्यानगर : जिल्हा ‘बिबट्या प्रवण’ क्षेत्र म्हणून गणला जाऊ लागला आहे. परिणामी बिबट्या, मनुष्य, पाळीव जनावरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण ठार झाले तर ८३ जण जखमी झाले आहेत तसेच ७१५५ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. त्यामुळे वनविभागाला तब्बल ८ कोटी ६७ लाख १५ हजार १३९ रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे.

जिल्ह्यातील वन विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली. जिल्ह्यात पूर्वी ऊस पट्ट्याच्या क्षेत्रात, उत्तर भागात अधिवास व खाद्य उपलब्ध होत असल्याने तेथे त्याचा वावर जाणवत होता. आता जिल्ह्याच्या दुष्काळी भागातही तो आढळू लागला आहे. अगदी अहिल्यानगर शहराच्या उपनगरातही हा संघर्ष येऊन ठेपला आहे.

ऊस तोडणीच्या हंगामात अधिवासास धक्का बसल्याने बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढते. बहुतांश भागात शेतकरी स्वतःच्या शेतावर वस्ती करून राहतात, त्यांची पाळीव जनावरे गोठ्यात बांधलेली असतात. अशा जनावरांच्या शोधात बिबट्या लोकवस्तीकडे येतो. शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी देताना बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरी भागातील लोकवस्तीतही बिबट्या धुमाकूळ घालताना दिसतो.

जिल्ह्यात बिबटे किती आहेत, याची गणना झाली नसली तरी वनविभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात बिबट्याचे प्रजनन वाढले आहे. अनेकदा रस्ता ओलांडताना जखमी वा ठार झालेले, भक्षाच्या शोधात विहिरीत पडलेले बिबटेही आढळतात. त्यांना वन विभागाकडून ‘रेस्क्यू’ केले जाते. उपचार करून पुन्हा अधिवासात सोडले जाते. परंतु अधिवासात सोडलेले बिबटे पुन्हा भक्षाच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेतात.

बिबट्याच्या उपद्रवाची आकडेवारी

बिबट्याच्या हल्ल्यात सन २०२३ मध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले, ५० जण जखमी झाले. ३७७३ पाळीव जनावरे मृत वा जखमी झाले तर सन २०२४ मध्ये ४ जण मृत्युमुखी पडले, ३३ जखमी झाले, पाळीव प्राणी मृत वा जखमी होण्याची संख्या ३३८१ आहे. मनुष्य मृत्युमुखी पडल्यास २५ लाख, जखमी झाल्यास ५० हजार, गंभीर जखमी झाल्यास ५ लाख रुपयापर्यंत तर पशूधनास बाजाभावाच्या ७५ टक्के रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. या सर्व घटनांमध्ये एकुण ८ कोटी ६७ लाख १५ हजार १२९ रुपयांची भरपाई वन विभागाकडून दिली गेली आहे. नुकसान भरपाईचे प्रस्ताव दहा दिवसात मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.

विविध उपाययोजना

ज्या भागात बिबट्याचे अस्तित्व आहे तेथे पथक तयार करून, गावात फलक लावून, दवंडी देऊन, ग्रामस्थांची बैठक घेऊन जनजागृती केली जाते. दैनंदिन सनियंत्रणासाठी ट्रॅप कॅमेरे लावून, विशेष पथक तयार करून बिबट्याचे पगमार्क, विष्ठा व छायाचित्रे तपासून नियंत्रण ठेवले जाते. बिबट्याचा वनक्षेत्रातच अधिवास वाढावा यासाठी कुरण विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. बिबट्या पकडण्यासाठी प्रसंगी त्याला ‘रेस्क्यू’ करण्याच्या कौशल्याचे प्रशिक्षण वन कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. ऊसतोड हंगामात बिबट्या हल्ल्याच्या घटना घडू नयेत यासाठी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊसतोड मजुरांनी घ्यायच्या खबरदारीचे सूचना देणारे पत्र पाठवले आहे. वनविभागाकडे सध्या २०० पिंजरे आहेत, आणखी १०० पिंजर्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘डीपीसी’कडे निधीची मागणी करण्यात आली आहे. धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, अहिल्यानगर.

Story img Loader