प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा भूविकास बंॅकेच्या ४२ कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन थांबलेले असतांना बॅंकेच्या ८९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रत्येकी ४ ते १४ लाखापर्यंतची सेवानिवृत्तीनंतर मिळणारी हक्काची कोटय़वधीची रक्कम पाच वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.           
जिल्ह्य़ात भूविकास बॅंकेच्या बुलढाणा, खामगाव, मेहकर व देऊळगावराजा येथे शाखा आहेत. या बॅंकेत सध्या ४२ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकित आहे. त्यामुळे त्यांची मोठी गळचेपी होत आहे. आज-उद्या वेतन मिळेल, या आशेने हे कर्मचारी कामकाज पार पडत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तर मोठी परवड बंॅक प्रशासनाने चालविली आहे. गेल्या पाच वर्षांंपासून ८९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान-महागाई भत्त्यावरील अतिरिक्त वाढ, शिल्लक रजेचा पगार व नियमित पगाराची रक्कम दिली गेलेली नाही. ही प्रलंबित कोटय़वधीची रक्कम सेवानिवृत्तांना देण्यासाठी बॅंक कोणतीही व्यवस्था करीत नाही. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक व बॅंकेचे अवसायक व जिल्हा व्यवस्थापकांशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वारंवार संपर्क साधला. मात्र, कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. ही प्रलंबित रक्कम न मिळाल्यामुळे औषधोपचारविना दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तसेच उतारवयात उपजीविकाचे दुसरे कोणतेच साधन त्यांच्याकडे नाही. मुला-मुलीचे लग्न व शैक्षणिक कार्य पार पाडणे त्यांच्यासाठी या परिस्थितीमुळे दुरापास्त झाले आहेत.
सेवानिवृत्तांच्या प्रलंबित रकमेबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक गांधी भवनात सोमवारी बैठक घेण्यात आली.
या सर्व परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाने कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करावा व हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली, तर शासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धारही या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक डी.के. पवार यांनी दिली.

Story img Loader