विश्वास पवार
पर्यटन, धार्मिक स्थळे आणि शेतीचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा आता उद्योग क्षेत्रातही भरारी घेत आहे. गेल्या पंधरा वर्षांत पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर हे यश संपादन केले. छोटय़ा-मोठय़ा उद्योगांपासून विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (सेझ) अनेक ठिकाणी उद्योगांचे जाळे जिल्ह्यात पसरले आहे. यातून केवळ रोजगाराच्याच संधी निर्माण झाल्या नाहीत, तर नागरीकरण आणि अर्थकारणालाही गती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत रस्ते, दळणवळणाच्या आधुनिक सोयींबरोबर जिल्ह्याची ओळख आणि चेहरामोहरा बदलू लागला आहे. जिल्ह्याला सुरुवातीपासूनच पाणी, वीज आणि जमिनीची मुबलकता होतीच, त्याला या गतिशील दळणवळणाची जोड मिळताच उद्योगांची नजर साताऱ्याकडे हळूहळू केंद्रित होऊ लागली. जिल्ह्याचा औद्योगिक इतिहास पाहिला तर जरंडेश्वरचा भारत फोर्ज, सातारा रोडचा कूपर उद्योग, राज्य शासन आणि बजाज यांच्या भागीदारीतील मोटार आणि स्कूटरचा कारखाना, सूटकेस, वाहनांचे सुटे भाग, खेळणी तयार करणारे उद्योग हीच ती काय गेल्या पन्नास वर्षांतील मिळकत.. त्यात फारशी वाढ किंवा आहे त्या उद्योगांचाही विस्तार झाला नाही.
मात्र मागील पंधरा वर्षांत औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढत गेले. या दहा वर्षांतच जिल्ह्यातील फलटण, खंडाळा भागात विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आकारास आले. जोडीने सातारा, वाई, कराड (तासवडे), लोणंद, फलटण आणि कोरेगाव येथील औद्योगिक वसाहतींनीदेखील कात टाकली आहे. औषधांपासून ते वाईनपर्यंत आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांपासून ते डिझेल इंजिनपर्यंत अशा विविध उत्पादनांचे हे प्रकल्प जिल्ह्यात आले असून त्यातून लाखो जणांना रोजगाराची संधी निर्णाण झाली आहे. जिल्ह्यात आजमितीला कूपर, भारत फोर्ज, अल्फा लावल, गरवारे वॉल रोप्स, गरवारे फुल प्लेक्स, भारत पेट्रोलियम, कमिन्स, रिएटर, एसीजी कॅप्सूल ग्रुप, के. एस. बी. पंप, निप्रो, एशियन पेंट्स, गोदरेज असे ६८ मोठे उद्योग कार्यरत आहेत. केवळ या मोठय़ा प्रकल्पांची जिल्ह्यातील गुंतवणूक ११ हजार ८५० कोटी रुपयांच्या घरात आहे, तर त्यांनी जिल्ह्यात नऊ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती केली आहे. गेल्या दहा वर्षांत विकसित झालेले खंडाळा आणि फलटण येथील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) सर्वात लक्षवेधी ठरले आहे. केवळ या दोन वसाहतींमध्ये तब्बल २७ आंतरराष्ट्रीय प्रकल्प आले आहेत. या विदेशी कंपन्यांनी या दोन ठिकाणी केलेली गुंतवणूक ही तब्बल ८८५०.५३ कोटी रुपयांची आहे. या जोडीनेच या दोन ठिकाणी देशांतर्गत ७० प्रकल्प आले असून त्यांची ४२३७.०८ कोटींची गुंतवणूक आहे. खंडाळा आणि फलटण औद्योगिक क्षेत्रातच २ लाख ९ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील या उद्योग साखळीमुळे तब्बल २७ हजार ५०८ लघुउद्योगही इथे उभे राहिले आहेत. या लघुउद्योगांची गुंतवणूक देखील ६ हजार ६३ कोटी रुपयांची असून त्यांनी १.४६ लाख जणांना रोजगार पुरवला आहे.
जिल्ह्यातून गेलेला पुणे-बंगळूरु महामार्ग, पुण्या-मुंबईशी असलेले सान्निध्य, पुण्या-मुंबईत होणारी रेल्वे-हवाई वाहतुकीची सोय, जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, लोंणद, वाई, सातारा आणि कराड परिसरात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेली जमीन आणि पाणी-विजेचा नित्य पुरवठा या साऱ्यांमुळे साताऱ्यातील हे उद्योग विश्व झपाटय़ाने विकसित आणि विस्तारित गेले आहे. या उद्योग विस्तारामुळे केवळ इथे गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच झाली नाही तर स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळाली आहे. या उद्योगांमुळे खंडाळा, फलटण, लोंणद, वाई, सातारा आणि कराड परिसरातील नागरीकरणही झपाटय़ाने वाढले. शांत, निवृत्तांचे शहर असलेल्या सातारा, वाईमध्येही मोठे निवास प्रकल्प साकार झाले आहेत. शिरवळ, खंडाळा, लोणंद, फलटणचीही आता शहरे बनली आहेत. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागवण्यातून पुन्हा नवनवे उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. साताऱ्यातील उद्योग विस्ताराबाबत साताऱ्याचे जिल्ह्याधिकारी रुचेश जयवंशी म्हणतात, की जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने, सौरऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातही उद्योग येत आहेत. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही असल्याने गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. देशी-विदेशी कंपन्यांकडून जागेची मागणी होत आहे.
नवीन उद्योजक वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, युनिकॉर्न असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील प्रसिद्ध कूपर उद्योग समूहाचे फारूक कूपर या भरारीबद्दल म्हणतात, की आम्ही साताऱ्यामध्ये उद्योग उभा केला तेव्हा रस्ता, टेलिफोन, वीज मूलभूत सुविधाही नव्हत्या. आता या पायाभूत सुविधांमध्ये सातारा अग्रेसर आहे. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळत आहे. शासन आपल्याला जागा, वीज, पाणी, अनुदान देते. आता बँका विनातारणही अर्थसाहाय्य करत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी प्रामाणिकपणे, सचोटीने, जिद्द आणि धाडसाने उद्योग उभारावेत. शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ याचा फायदा उद्योजकांनी घ्यायला हवा. सातारा हा मूलत: कृषिप्रधान जिल्हा. वाई, पाचगणी, महाबळेश्वरमुळे जिल्ह्यात सुरुवातीपासून पर्यटन व्यवसायानेदेखील जोर पकडलेला होता. या कृषी आणि पर्यटन उद्योगालाही जिल्ह्यातील या बदलांचे बळ मिळाले आहे. छोटय़ा-मोठय़ा दुकानांपासून ते हॉटेल, लॉज, मॉलपर्यंत अनेक आस्थापना इथे आता सुरू झाल्या आहेत. यामध्ये पुन्हा स्थानिक तरुणांनी मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेतला आहे.
कमतरता काय?
जिल्ह्याचा बहुतांश विकास हा जिल्ह्याच्या महामार्गालगतच दिसत आहे. जिल्ह्याच्या दुर्गम आणि दुष्काळी भागात अद्याप विकासाचे वारे पोहोचलेले नाहीत. कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये नव्याने होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या ‘विशेष कॉरिडोर’मुळे प्रगतीचे नवे दार उघडणार आहे. जावळी, महाबळेश्वर, सातारा, पाटणच्या दुर्गम भागातही कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देत विकासाला गती देणे शक्य आहे. या भागात रस्ते, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा वाढवणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या निसर्गसंपदेमुळे विविध चित्रीकरणासाठीही सातारा जिल्ह्याला पसंती मिळते. या क्षेत्रालाही उद्योगाचे रूप देत त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार वाढवला जाऊ शकतो.
कृषी क्षेत्रात सुधारणांची गरज
सातारा हा कृषिप्रधान जिल्हा असला तरी या क्षेत्रात आवश्यक बदल घडलेले नाहीत. साताऱ्यात धरणांचे मोठे व छोटे अनेक प्रकल्प उभे राहिले, मात्र अद्याप जिल्ह्यात सर्वत्र पाणी पोचलेले नाही. परिणामी आजही मोठय़ा प्रमाणात शेती ओलिताखाली आलेली नाही. सिंचन सुविधा अपूर्ण आहेत. जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पुणे, सोलापूर, सांगलीला जात आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून कुटुंबांना पुणे, मुंबईत किंवा अन्यत्र रोजगारासाठी जावे लागते. शेतीमालासोबत बाजारपेठांची जोड आणि उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग, साठवणगृहांची आवश्यकता असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जाते.