शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या भाजपच्या व्यासपीठावर शनिवारी प्रत्यक्षात बेशिस्तीचेच उघड प्रदर्शन घडले! निमित्त होते भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या आगमनानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेचे.
मुंडे यांच्या स्वागताची शहरात गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर शहरात सर्वत्र जोरदार पोस्टरबाजीही करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आदींची छायाचित्रे पोस्टरवर झळकत होती. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र पोस्टरवर कोठेही स्थान दिले नव्हते. सभास्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. काही इच्छुकांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांच्या समर्थकांनीही गर्दी केली होती. मात्र, व्यासपीठावर जमलेल्या गर्दीने कहरच केला. पक्ष पदाधिकारी-कार्यकर्त्यांनीच व्यासपीठ बळकावल्याचे चित्र तयार झाले. त्यामुळे मुंडे यांनाही याचा फटका बसला. भाषण करताना त्यांना पदाधिकाऱ्यांचाच अडथळा निर्माण झाला. मुंडेंनी वारंवार सूचना करूनही उत्साही पदाधिकारी, कार्यकत्रे व्यासपीठावरून खाली उतरत नव्हते. अखेर पोलिसांनीच हस्तक्षेप करून व्यासपीठावरील गर्दी हटवली. नंतरच मुंडेंचे भाषण पुढे सुरू झाले. या वेळी व्यासपीठासमोरील झेंडे लोकांच्या हातात द्या, झेंडय़ांचा मान राखा अशा सूचना मुंडे यांनी केल्या. सूरजितसिंग ठाकूर यांच्याशिवाय पक्षाचा राज्यस्तरीय कोणताही नेता उपस्थित नव्हता. सभास्थळी तिघा खिसेकापूंना पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘सिंचन घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू’
राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करू लागला. दुष्काळावर मात करण्यासाठी सिंचनाची गरज होती. मात्र, ७० हजार कोटी सिंचनाची कामे कागदोपत्री झाल्याने दुष्काळात शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. सिंचनाची कामे खऱ्या अर्थाने झाली असती, तर आजचे चित्र पाहावयास मिळाले नसते. त्यामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सिंचनातील घोटाळेबाजांना तुरुंगात घालू, असा इशारा मुंडे यांनी दिला.
मी बाबांसोबत काम केले. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे श्रेय त्यांनी मला दिले. त्यामुळे आता राजकारणात काहीतरी करून दाखवण्याची शक्ती मिळाली. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाबांच्या पराभवासाठी अनेक नेते जमवले, मात्र राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मी खासदार वा केंद्रात मंत्री व्हावे, अशी अनेक समर्थकांची मागणी आहे. मात्र, केंद्रात मंत्री अथवा खासदार होऊन काय मिळणार, असा प्रश्न करून बाबांसारखे लोकनेते होण्याचे माझे स्वप्न असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजप प्रदेश सरचिटणीस सूरजितसिंग ठाकूर, माजी आमदार गोिवदराव केंद्रे, गजाननराव घुगे, बाबाराव बांगर, बी. डी. बांगर, मनोज जैन, मििलद यंबल, तानाजी मुटकुळे आदींची उपस्थिती होती. यंबल, उत्तमराव जगताप आदींनी भाजपत प्रवेश केला. मुंडे यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा