बेळगावच्या नाटय़संमेलनात सीमाप्रश्नासंबंधी काहीतरी वक्तव्य होईल; निदान ठराव तरी केला जाईल, ही अपेक्षा अखेर फोल ठरली. रविवारी सकाळी नाटय़ परिषदेच्या विषय नियामक समितीच्या सभेत चंद्रकांत कुलकर्णी आणि अशोक हांडे यांनी या ठरावासंबंधात आग्रह धरला. मात्र ‘हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि परिषदेच्या कार्यकक्षेत तो येत नाही,’ असे सांगून सीमाप्रश्नासंबंधीचा ठराव मांडण्याच्या त्यांच्या सूचनेस परिषदेच्या धुरिणांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे खुल्या अधिवेशनात हा ठराव न येताच ९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे सूप वाजले.
शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मात्र समारोपाच्या भाषणात सीमावादाच्या विषयाला स्पर्श केला. ते म्हणाले, ‘सरकारमधील मंत्री म्हणून मी यासंबंधात काही वक्तव्य करू शकत नसलो, तरी घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कलम पाहता इथे त्याची पायमल्ली झाली आहे, असे वाटते.’ मराठी माणसाचा हुंकार थांबवायचा प्रयत्न येथील पोलीस प्रशासनाच्या अटींतून केला गेला आहे का, अशीही मला रास्त शंका येते. त्यामुळेच मी कर्नाटक सरकारचे आदरातिथ्य स्वीकारलेले नाही. त्यासंबंधीचा राज-शिष्टाचार मी नाकारला आहे, असेही त्यांनी सांगितले.
भीमसेन जोशी, गंगुबाई हनगळ यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांच्या बाबतीत आणि त्यांच्या कलेच्या बाबतीत आमच्या मनात कधीही संकुचित प्रांतवाद आला नाही, येत नाही. सांस्कृतिक क्षेत्र हे राजकारणापासून मुक्त ठेवण्याचीच आमची भूमिका आहे, याचीही आठवण रावतेंनी दिली.
या संमेलनास ‘बाळासाहेब ठाकरे नाटय़नगरी’ असे नाव देऊन बेळगावकरांनी आपल्या भावना स्वच्छपणे प्रकट केल्या आहेत. तसेच आमची लढाई यापुढेही तितक्याच जोशाने सुरूच राहील. मात्र त्याकरिता सांस्कृतिक क्षेत्राचा आखाडा आम्ही वापरू इच्छित नाही, असे रावते म्हणाले.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत हे नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य या नात्याने बोलताना म्हणाले की, बेळगावातल्या लोकांना ‘आम्ही तुमचेच आहोत’ हे सांगण्यासाठीच आम्ही बेळगावात नाटय़संमेलन भरविले. महाराष्ट्र आणि इथल्या मराठी भाषकांचे नाते अधिक दृढ व्हावे हीच त्यामागची आमची भावना आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी बेळगावकरांनी संमेलनास दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नाटय़संमेलनाध्यक्ष फैयाज शेख यांनीही बेळगावकरांचे नाटक आणि कलावंतांवरचे प्रेम असेच कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पवारांची जीभ का अडखळली?
नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप ‘जयहिंद.. नमस्कार’ असा केला. ‘जय महाराष्ट्र म्हणायला त्यांची जीभ का अडखळली?’ असा खडा सवाल दिवाकर रावते यांनी भाषणात केला. दुसऱ्या व्यासपीठावर मात्र ते ‘जय हिंद, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र’ म्हणतात. मग इथे हा विरोधाभास का, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा