लाडघरचा आदर्श कायापालट, दिवाळी बीच फेस्टिव्हलचे आयोजन

काही वर्षांपूर्वी दारूभट्टय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या लाडघर गावाचा आता आदर्श कायापालट झाला असून येथे यंदा चक्क दिवाळी सुटीत बीच फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात गावाला यश आले आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या संजय यादवराव यांनी या महोत्सवासाठी ग्रामस्थांना प्रेरित केले.

मुळात काही वर्षांपूर्वी लाडघर गाव दारूभट्टय़ांसाठी प्रसिद्ध होते. येथून जिल्ह्य़ाबाहेर दारूचा साठा मोठय़ा प्रमाणात वितरित करण्यात येत असे. या दारूभट्टय़ांविरोधात होणाऱ्या पोलीस कारवाया तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात चच्रेचा विषय ठरत असे.

अर्थात या बेकायदा व्यवसायामुळे किनाऱ्यावर होणारे प्रदूषण हे गावासाठी दिवसेंदिवस तात्कालीन चिंतेचा विषय बनत होता. या प्रश्नाकडे स्थानिक ग्रामस्थ दत्ता नार्वेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याला अनुकूल प्रतिसाद मिळून आता ग्रामस्थांनी या बेकायदा धंद्याला गावातून हद्दपार करून पर्यटन व्यवसायाची ‘ज्योत’ घराघरात पेटवली. येथील मनमोहक समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्याला अल्पावधीतच पर्यटकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

आणि येथे घरोघर न्याहारी-निवास व्यवस्था, रिसॉर्ट व्यवसाय वाढीस लागला. अल्पावधीत गाठलेले हे यश दापोलीचा पर्यटन आलेख वाढवण्यास साह्य़कारी ठरलेच, पण पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरूड-कर्दे गावाला पर्याय ठरू लागले. ही बाब कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या लक्षात आल्यानंतर दापोलीतला पर्यटनाचा हा नवा पर्याय अधिक परिणामकारक पर्यटकांसमोर आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यालाच अनुलक्षून गावातील ग्रामस्थ, रिसॉर्ट व्यवसायिकांसह त्यांनी येथे बीच फेस्टिव्हलची कल्पना अमलात आणण्याचे ठरवले.

लाडघर येथे भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भि. रा. इदाते यांच्या हस्ते नुकतेच या बीच फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कोकणातल्या वेगवेगळ्या आहार संस्कृती, लोककला, तसेच बलगाडी, गायीचे गोठे आदींनी नटलेले ग्रामीण जीवन यासह आधुनिक वॉटर स्पोर्ट्स, रात्रीची बोट सफारी, हेरिटेज वॉक आदीचा आनंदही पर्यटकांना घेता येणार आहे.  हा महोत्सव १४ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे नियोजन कोकण ग्रीन लाईफचे सागर सकपाळ करत आहेत.

Story img Loader