रुरल अॅण्ड यंग फाऊंडेशन रायगड व शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या कुलाबा किल्ल्यात दीपोत्सव म्हणजे दिवाळी साजरी करण्यात आली.
इतिहासाची आवड जोपासून सामाजिक भावना मनात ठेवून गेली तीन वष्रे रुरल अॅण्ड यंग फाऊंडेशन या संस्थेकडून दीपोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जातो. इतिहासाप्रमाणे आपले गौरवशाली किल्लेसुद्ध थोडय़ा वेळासाठी का होईना असंख्य पणत्या व मशालीच्या प्रकाशात प्रकाशमान करणे हा मुख्य हेतू दीपोत्सवामागे आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या संस्थापक अॅड. रिमा सावंत यांनी केले. यंदाच्या दीपोत्सवात अलिबाग, मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातून पाच ते सत्तर वष्रे वयोगटाच्या १५० इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी प्रत्यक्ष किनाऱ्यावर येऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष गजानन टिके व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सुरुवातीला किल्ल्याची स्वच्छता करून भगवा ध्वज गजानन टिके व शिवशौर्याचे अध्यक्ष अमित मेंगले यांच्या हस्ते फडकावला. त्यानंतर मावळतीला जवळजवळ दोन हजार पणत्या व दीडशे मशाली व पन्नास आकाशकंदील यांच्या प्रकाशात किल्ल्यातील मंदिर, बुरुज, प्रवेशद्वार व आसमंत उजळून निघाले. रात्री वरसोली रमेश पडवळ यांच्या लहान शिलेदारांनी दांडपट्टा, तलवार, लाठी-काठी आणि मर्दानी खेळ सादर करून सर्वाना थक्क करून सोडले. चारी बाजूने वेढलेल्या समुद्रातील या किल्ल्यात दिवाळी साजरी करून रात्रभर मुक्काम एक विलक्षण अनुभव प्रत्येक सहभागी इतिहासप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुरल अॅण्ड यंग फाऊंडेशनचे सर्व कार्यकत्रे झटत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा