|| रमेश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भात खरेदी रखडली; उद्घाटन होऊन पंधरा दिवस उलटले तरी केंद्र बंदच

वाडा :  दिवाळीच्या तोंडावर पाठ थोपटून घेण्यासाठी वाड्यातील तिन्ही आमदारांनी घाईगडबडीने भात खरेदी केंद्रांची उद्घाटने केली. मात्र ही उद्घाटने होऊन १५ ते २० दिवस झाले तरी अजूनपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर भाताची खरेदी सुरू झालेली नाही. ही खरेदी बारदाना (पोती) अभावी रखडली असल्याची कबुली आता आमदारांकडूनच दिली जात आहे.

वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील सुमारे १४,५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. या वर्षी करोनाचे सावट व परतीच्या पावसाचे संकट असतानाही येथील शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून थोडेफार भाताचे पीक घरात आणले आहे. जे शेतकरी निव्वळ भात पिकावर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांना भाताची विक्री करून संसाराचा गाडा चालवावा लागतो. तसेच शेतीची अवजारे, भात बियाणे, खते, औषधे यांची उधारी फेडावी लागत असते, यासाठी हे शेतकरी भाताची विक्री करण्याची घाई करीत असतात. मात्र येथील खरेदी केंद्रांची उद्घाटने होऊन २० दिवस झाले तरी अजूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नसल्याने मातीमोल भावाने या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांना भात विकावे लागत आहे.

वाडा तालुक्याचे तीन भाग तीन विधानसभा मतदारसंघांना जोडले गेले आहेत. शहापूर मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा, भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे व विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा हे तीन आमदार वाडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. या तिन्ही आमदारांनी दिवाळी पूर्वी घाईघाईने भात खरेदी केंद्रांची उद्घाटने केली. मात्र प्रत्यक्षात ही केंद्र आजतागायत सुरू झालेली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

भिवंडी ग्रामीण या मतदारसंघात वाडा तालुक्यातील ७० हून अधिक गावे आहेत. येथील शेतकऱ्यांचे भात हेच एकमेव पीक असताना एकही भात खरेदी केंद्र उभारण्यात आलेले नाही. तालुक्यातील उर्वरित गावांसाठी एकूण ९ खरेदी केंदे्र  मंजूर करण्यात आली असून या ठिकाणी अजूनपर्यंत खरेदी सुरू करण्यात आलेली नाही.

भाडे थकवल्याने महामंडळावर नाराजी

गतवर्षी भाताची साठवणूक करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी तसेच सेवा सहकारी संस्थांनी गोदामे आदिवासी विकास महामंडळाला भाड्याने दिली होती. त्याचे भाडे अजूनही न दिल्याने महामंडळाला पुन्हा गोदामे भाड्याने देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.

बारदान खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या आठवडाभरात बारदानाचा प्रश्न सोडवला जाईल. – सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड.

 

स्वत:च्या बारदानातून भात विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी सुरू करण्यात आली आहे. महामंडळाची बारदाने आल्यानंतर शेतकऱ्यांना ती परत केली जातील. – राजेश पवार, उप प्रादेशिक व्यवस्थापक, मोखाडा/वाडा