|| नितीन बोंबाडे
रांगोळी आविष्कारातून सरकारी धोरणाचा निषेध
डहाणू : डहाणू किनारपट्टीच्या गावांमध्ये वाढवण बंदर विरोधाचे भावनिक प्रतिबिंब दिवाळीच्या सणानिमित्ताने घरोघरी रांगोळी आविष्कारातून ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ अशा अनेक घोषणेतून उमटलेले पाहायला मिळाले. तसेच भाऊबिजेनिमित्ताने महिलांनी वाढवण बंदरावरील सुरूच्या झाडांना ओवाळणी करून गावांच्या रक्षणाची भावनिक आळवणी करून अनोखी भाऊबीज साजरी केली.
डहाणू किनारपट्टीवरील वाढवण येथे होऊ घातलेल्या महाकाय बंदरामुळे किनारपट्टीवरील तसेच आसपासच्या ४० हून अधिक गावांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. वाढवण बंदर झाल्यास पारंपरिक व्यवसायांवर गदा येणार असून बागायतदार, मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. ऐतिहासिक शंखोदर देवस्थान लुप्त होणार आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत बंदराला विरोध करण्याची भूमिका वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, ग्रामस्थांनी घेतली आहे. १४ नोव्हेंबर रोजी वाढवण येथे तेथील ग्रामस्थांतर्फे वाढवण बंदरविरोधी रांगोळी स्पर्धा पार पडली. त्यात वाढवण येथील तरुण व तरुणींनी अतिशय सुंदर पद्धतीने निरनिराळ्या वाढवण बंदरविरोधी संकल्पना आपापल्या रांगोळींमध्ये मांडल्या. सदर स्पर्धेच्या आयोजकांचे आपल्या वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले होते. भाऊबिजेनिमित्ताने महिलांनी निसर्गशक्ती आणि सागराला आळवणी करून गावाच्या रक्षणाची मागणी केली. एकूणच दिवाळीच्या सणाला वाढवण, वरोर, गुंगवाडा, वासगाव, धाकटी डहाणू, यासह गावांमध्ये सणावर वाढवण बंदरविरोधाची छाया पसरल्याचे चित्र दिसून आले. सणानिमित्त राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना वाढवण बंदराच्या तीव्र विरोधाचे दर्शन घडले.
आश्वासनांच्या पत्रकांचे वाटप
वाढवण बंदर रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पत्रकेही वाटण्यात आली. तारापूर- चिंचणी- डहाणू राज्यमार्गावर जागोजागी रांगोळी, फलकांमधून वाढवण बंदराच्या विरोधाच्या संदेशांतून ग्रामस्थांच्या तीव्र भावनांचे दर्शन घडल्याने दिवाळी सणावर वाढवण बंदराच्या विरोधाची छाया पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
डहाणू येथे होऊ घातलेल्या विनाशकारी वाढवण बंदराला आमचा मरेपर्यंत विरोध राहील. दिवाळीनिमित्ताने रांगोळी प्रदर्शनातून गावातील नागरिकांच्या तीव्र भावना मांडण्यात आल्या आहेत.
-अनिकेत पाटील, ग्रानस्थ वाढवण