मंदी, नोटाबंदी, जीएसटीने वाढलेली महागाई या साऱ्यांमध्ये होरपळलेल्या नागरिकांनी यंदा त्यांच्या दिवाळी खर्चात मोठी बचत केली आहे. याचा सर्वात मोठा झटका फटाके विक्रीला बसल्याचे यंदा दिसून आले आहे. राज्यभरात सर्वत्रच यंदा फटाके विक्री मोठय़ा प्रमाणात कमी झाली असून एकटय़ा सांगली जिल्ह्य़ातील फटाक्यांची ही उलाढाल २ कोटींहून यंदा ४० लाखांवर आली आहे. न खपलेल्या या मालाचे पुढे काय करायचे हाही प्रश्न या विक्रेत्यांना पडला आहे.

मंदी, जीएसटी, नोटबंदी याचा थेट परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर झाला असून दसऱ्यापासून बाजारात तेजी अपेक्षित असते. मात्र, यातूनही खिशात असलेल्या चार पैशातून उत्सवासाठी गरजेच्या अशा फराळ, पूजा साहित्य, मुलांसाठी कपडे आदी गोष्टी घेण्यावरच बहुतेकांनी भर दिलेला दिसतो आहे. याचा सर्वात मोठा फटका शेवटचा पर्याय असलेल्या फटाक्यांच्या खरेदी विक्रीला बसला आहे.

दर दिवाळीला अभ्यंगस्नान झाल्यानंतर फटाके फोडण्याची प्रथा आहे. या प्रथेसाठी काहींनी किरकोळ फटाके वाजविले. बाजारात फूलबाज्या, भुईनळे, भुईचक्र, चुटपुट, फटाक्याच्या माळा, सुतळी बॉम्ब, बाण, लक्ष्मी तोटे आदी प्रकार उपलब्ध होते. यंदा मात्र, यापैकी मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांची मागणी तर खूपच कमी झाली. दिवाळीत पाच दिवसांऐवजी केवळ लक्ष्मीपूजनाला आणि तेही व्यापारी पेठेतच यंदा फटाके वाजवले गेले. सर्व सामान्यांनी लहान मुलांच्या हौसेखातर त्यांची हौस केवळ फुलबाजी किंवा तस्सम फटाक्यांवर भागवली.

सांगली शहरात ६५, मिरजेत ३० आणि कूपवाडमध्ये १० फटाके विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले होते. सांगलीत डॉ. आंबेडकर स्टेडियम, मिरजेत मिरज हायस्कूल आणि कूपवाडमध्ये खुल्या नाटय़गृहाच्या मदानावर प्रशासनाने फटका स्टॉलला परवानगी दिली होती. पण यंदा या सर्वच विक्रेत्यांकडील विक्रीत मोठी घट आल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी या हंगामात एका स्टॉल धारकाची किमान दोन लाखांची उलाढाल होत असते ती यंदा २५ ते ३० हजार देखील झालेली नाही. मुख्य वितरकाकडून हा माल उधारीवर आणलेला आहे. आता या न विकलेल्या मालाचे काय करायचे, तो सांभाळायचा कसा, त्याचा खर्च कुणी करायचा आदी प्रश्न या विक्रेत्यांना पडले आहेत.

यंदा औद्योगिक मंदी, शेतीत झालेले नुकसान, नोटाबंदीमुळे नकारात्मक वातावरण या साऱ्यांचा परिणाम आमच्या व्यवसायावर झालेला दिसतोय. फटाके विक्रीत एवढय़ा मोठय़ा प्रमातील घट ही पहिल्यांदाच अनुभवतो आहे.

– सुनील हिरगुड, फटाके विक्रेते, मिरज.

Story img Loader