अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी किंवा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील व्यापक प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळी सणासाठी नियमावली जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहेत नियम?

१. राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी.

२. दिपावलीच्या काळाच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.

३. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचं तंतोतंत पालन करावं.

४. दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

५. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यत ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचं काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत.

६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali guidelines for firecrackers shopping corona rules maharashtra government pmw