शब्दालय
बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘शब्दालय’ने या वर्षी अंकाचा डोलारा उभा केला आहे. त्याचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. प्रसारमाध्यमांविषयी चर्चा करणारा. तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमांनी विविध रूपे घेतली तसेच समाजमनाचा अक्षरश: ताबा घेतला, परिणामी प्रसारमाध्यमांचे समाजजीवनावर होणारे परिणाम, त्याची कार्यपद्धती, या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मानसिकता व दृष्टिकोन आदीचा मागोवा घेताना मुख्यत: या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लिहिते केल्याने ‘शब्दालय’चा हा अंक विविध पैलूंची मीमांसा करतो. प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरूप (जयंत पवार), आव्हाने आणि संधी (राजीव साबडे), कृषी पत्रकारिता- विनोद आणि शोकांतिका (अशोक तुपे) आदी उल्लेखनीय लेखांसह दीपक करंजीकर, विजय चोरमारे, अरुण खोरे, अभिनंदन थोरात, दिलीप ठाकूर, श्रद्धा बेलसरे, महावीर जोंधळे, सुधीर देवरे, प्राजक्ता थोरात, मंगेश कश्यप आदींनीही प्रसारमाध्यमाच्या व्याप्तीचा आणि त्यातील बऱ्या-वाईटाचा आढावा घेतला आहे. कथा विभाग मनस्विनी लता रवींद्र, शार्दूल सराफ, वसुधा देव, चिन्मय पाटणकर आदींच्या लेखनाने वाचनीय ठरला आहे. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रसृष्टीतील कलावंतांच्या संघर्षांचा रवींद्र पाथरे यांनी परामर्ष घेतला आहे. अभिनेता सयाजी शिंदे, किशोर कदम यांच्या मुलाखती हेदेखील यंदाचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय दिल्लीस्थित पत्रकार प्रीथा चॅटर्जी यांनी निर्भया बलात्कार व हत्येच्या प्रकरणात ती असाहाय्य युवती दवाखान्यात दाखल झाली तेव्हा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनोवस्था सांगणाऱ्या इंग्रजी वृत्तलेखाचा रंगनाथ पठारे यांनी आवर्जून केलेला अनुवाद या अंकात वाचायला मिळतो. कविता विभाग संतोष पवार, प्रकाश होळकर, इंद्रजित भलेराव, नारायण काळे, सिसिलिया काव्र्हालो आदींच्या कवितांनी सजला आहे.
शब्दालय, संपादक : सुमती लांडे, किंमत : १५० रुपये
—
लोकमत दीपोत्सव
दर्जेदार आणि सकस मजकुराची पर्वणी देण्याची परंपरा लोकमत दीपोत्सवने यंदाही जपली आहे. संपत्तीनिर्माणातही मूल्याधिष्ठित व्यवस्था अंगीकारणाऱ्या नारायण मूर्ती यांची सविस्तर मुलाखत आहे. रूढार्थाने नटीला साजेसे रूप तसेच पाश्र्वभूमी नसतानाही परिस्थितीशी टक्कर घेत यशोशिखर गाठणाऱ्या कंगना रनौटची कहाणी प्रेरणादायी आहे. पोर्नस्टार ते बॉलीवूड अभिनेत्री हे ध्रुवीकरण प्रत्यक्षात साकारणाऱ्या सनी लिओनीची मुक्ता चतन्य यांनी घेतलेली मुलाखत अडल्ट इंडस्ट्री, कार्यपद्धती, लोकांचा दृष्टिकोन याविषयी अंतर्मुख करणारी आहे. कुस्तीसारखा मातीतला खेळ ते दमसासाची परीक्षा पाहणारी नाजूक बासरी असा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा प्रवास जाणून घेणं अवश्य वाचनीय आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या लेकींचा प्रवाहाविरुद्ध वाटेवरला प्रवास सचिन जवळकोटे यांनी सुरेख उलगडला आहे.
संपादक : अपर्णा वेलणकर
किंमत : २०० रुपये.
दिवाळी अंकांचे स्वागत..
बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘शब्दालय’ने या वर्षी अंकाचा डोलारा उभा केला आहे. त्याचा विषयही जिव्हाळ्याचा आहे.
Written by रत्नाकर पवार
आणखी वाचा
First published on: 20-11-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali magazine