किरात
कोकणातील साहित्य आणि साहित्यिकांना प्रकाशझोतात आणणारा किरात ट्रस्टच्या दिवाळी अंकाचे हे ४१ वे वर्ष. सतत ९३ वर्षे कोकणातील साहित्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून देण्याचा ‘किरात’चा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला आहे. नाटय़ आणि सिने तसेच विविध खासगी वाहिन्यांमधल्या कोकणातील कलावंतांची मुलाखत ही या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ ठरली आहे. भाऊ कदम, गुरू ठाकूर, अनिकेत आसोलकर या व्यक्तिमत्वांची ओळख या मुलाखतीतून होते. महादेव सानेंची मिश्किली वाचकांच्या चेहऱ्यावर निश्चितच स्मितरेषा उमटवते. अनुराधा फाटक, पद्मा फार्पेकर
यांच्या कथाही वेगळ्या वळणाच्या आहेत. कथा, कवितांनी भरगच्च मजकूर असलेला किरातचा दिवाळी अंक वाचकांच्या निश्चितच पसंतीस पडेल.
संपादक : सीमा शशांक मराठे, किंमत : ९० रुपये.
==
लीलाई
सलग १६ वर्षे वसईतून निघणारा ‘लीलाई’ दिवाळी अंक विविध कथा, कवितांनी सजला आहे. गंगाराम गवाणकर, विजया वाड, बाळ राणे यांच्यासहित मार्कुस डाबरे यांच्या कथा तर जोसेफ तुस्कानो यांची विज्ञान कथा वाचकांच्या विशेष पसंतीस पडेल. विनोद आणि वाचनसंस्कृती या विषयावरील परिसंवादात दिलीप प्रभावळकर, मंगला गोडबोले आणि अतुल परचुरे यांचे विचार वाचण्यास मिळतात तर जगण्याशी नाते नाटक-चित्रपटाचे यात रमेश भाटकर, नयना आपटे, अरुण नलावडे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचे वेगळे स्वरूप पाहण्यास मिळते. संजय मिस्त्री, प्रभाकर वाईरकर आणि प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगनगरीने वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटल्याखेरीज राहत नाही.
संपादक : पूजा अनिलराज रोकडे, किंमत : १५० रुपये.
==
अर्थवेध
यंदाचा ‘अर्थवेध’ हा दिवाळी अंक अपंग व मानसिक विकलांग विशेषांक आहे. या अंकात जेनिटिक अभ्यास, गर्भसंस्कार, मतिमंदत्वाची कारणे, ऑटिझम, कर्णबधिर, अंध, अपंगांच्या समस्या, अपंगांसाठीचे कायदे आदी वाचनीय लेख आहेत. त्याशिवाय इच्छापत्र, देहदान, अवयव प्रत्यारोपण या विषयावरही माहितीपूर्ण लेख आहेत. अपंग व मानसिक विकारासंबंधी काम करणाऱ्या संस्थांची माहितीही या अंकात आहे. अपंगांना रोजगार, त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या सवलती यासंदर्भातही उपयुक्त माहिती या अंकात आहे.
संपादक : वैशाली साठे, किंमत : ७५ रुपये.