अधिष्ठान
दिवाळी अंकाच्या माध्यमातून संवाद साधताना गेली ३९ वर्षे स्वत:चा एक वाचकवर्ग तयार करणाऱ्या अधिष्ठान बाबत नक्कीच प्रत्येकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अंकातून हे वैविध्य जपण्याचा प्रयत्न करण्याशिवाय ‘अधिष्ठान’च्या संपादकीय विभागाकडेही कोणताही पर्याय नाही. म्हणूनच वाचकांशी असलेल्या याच बांधिलकीतून यंदाही अधिष्ठानतर्फे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अंकात चंद्रकांत खोत यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यात आले आहे. याचबरोबर व्यंगचित्राचे बादशहा आर. के. लक्ष्मण आणि त्यांनी साकारलेला कॉमन मॅन यांच्यातील भावविश्व देखील रेखाटण्यात आले आहे. याशिवाय ईश्वाकू कुळातील राजा सौदासाची कथा, भारतीय आणि पाश्चिमात्य रोमॅण्टिक संकल्पनेच्या संवेदनाचे अंतरंग, अंदमानची वैविध्यता यांचबरोबर सामाजिक विषयांवरील कादंबरी यांचादेखील समावेश या अंकात केला गेला आहे.
संपादक – मनोहर पांचाळ
पृष्ठे -२२२, किंमत १२०/-
महानगरी वार्ताहर
दिवाळी अंकाच्या माध्यमातून बदलत्या प्रवाहाचे साक्षीदार बनण्याची संधी वाचकांना दिली जाते. ‘महानगरी वार्ताहर’ या शीर्षकाखाली लिखित दिवाळी अंकात संपादक सतीश सिन्नरकर यांनी हाच प्रयत्न साकारल्याचे अंकातील वैविध्यातून नक्कीच दिसून येते. मुळात अंकाच्या प्रस्तावनेतून यांचा लवलेशही व्यक्त न होता मूळ अंकामधील कथामधून हा संवाद वाचकाशी साधला गेला आहे. कथा, मुलाखत, अनुवादित कथा, लेख, सिनेजगत, परिसंवाद, व्यंगचित्र, बालजगत, काव्य सुमने अशा वैविध्यामधून वाचकाला नावीन्यतेचा स्पर्श या अंकातून केला गेला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ मालिकेतील देवदत्त नागे यांचा संघर्षपूर्ण यशाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे, तर राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व-संभाजीराव भिडे गुरुजी यांसारख्या व्यक्तिमत्त्वाची छापदेखील वाचकांच्या मनात उमटत आहे.
संपादक – सतीश सिन्नरकर,
पृष्ठे – २०९, किंमत -१५० /-
वसंत
वसंत मासिक मागील ७३ वर्षांपासून दरमहा प्रसिद्ध होत आहे. यंदाच्या दिवाळी अंकाने कथा-कवितांपेक्षा समीक्षात्मक आणि वैचारिक लेखांना प्रमुख स्थान दिले आहे. समान नागरी कायदा ( मा. गो. वैद्य), पुरस्कार- काही विचार (प्रा. मधु जामकर), शेक्सपीअर आणि मराठी नाटक (डॉ. उषा देशमुख), ज्योतिषविद्येच्या अवतीभोवती ( डॉ. द. भि. कुलकर्णी), दिवंगत ज्ञानतपस्वी डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणारा त्यांची भाची व ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी लिहिलेला ललित लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ ठरावेत. डॉ. बाळ फोंडके, माधुरी शानबाग, वसंत कुंभोजकर, प्रवीण दवणे यांचे साहित्यदेखील या अंकाचा आकर्षण आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांबद्दल ‘मोले घातले रडाया’ हे परखड संपादकीय सद्य:परिस्थितीचा वेध घेणारे आहे.
संपादक – दिलीप देशपांडे
पृष्ठे – २१०, किंमत – १००/-