‘धनंजय’चा दिवाळी अंक आणि विविध विषयांवरील कथा हे समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झाले आहे. यंदाच्या ५५व्या वर्षीही या अंकाने ही परंपरा राखली आहे. या अंकात विज्ञान, गूढ, रहस्य, युद्ध, साहस, दहशत, सूड आदी अनेक विषयांवरील कथांची रेलचेल आहे. यशवंत रांजणकर यांची हिरण्यदुर्ग ही इतिहासकालीन गूढकथा वाचकांना खिळवून ठेवते, तर इमारतींच्या पुनर्विकासामुळे अडचणीत येणाऱ्यांची व्यथा राजेंद्र चौधरी यांनी हनुमान या कथेत मांडली आहे. आभास या कथेत पूर्णिमा खरे यांनी दहशतवादी कारवायांचे केलेले वर्णन मन विषण्ण करते. नील आर्ते आणि प्रसन्न करंदीकर या ताज्या दमाच्या लेखकांच्या कथाही जमून आल्या आहेत. फिल्म्स डिव्हिजनमध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असणाऱ्या प्रेम वैद्य यांचा १९६५चे भारत-पाक युद्ध हा लेखही अतिशय माहितीपूर्ण आहे. माधुरी तळवलकर यांनी त्याचा ओघवता अनुवाद केला आहे.
संपादिका- नीलिमा राजेंद्र कुलकर्णी,
पाने ३३२, किंमत- २०० रुपये
चंद्रकांत
‘धनंजय’चे भावंडं म्हणता येईल अशा चंद्रकांत या दिवाळी अंकाचे हे ५२वे वर्ष. चार पूर्ण लांबीच्या कादंबऱ्यांचा समावेश हे या अंकाचे प्रमुख वैशिष्टय़. उमेश कदम यांची धर्मातर, अरुण हेबळेकर यांची भुवनार्गला, माधुरी तळवलकर यांची चकवा व सागर कुलकर्णी यांची हा जय नावाचा इतिहास नाही वर्तमान आहे या चारही कादंबऱ्या वाचनीय आहेत. यातील उमेश कदम व सागर कुलकर्णी या नव्या पिढीतील लेखकांची कामगिरी आश्वासक आहे. कादंबरीविषयक लेख या सदरात डॉ. प्रदीप कर्णिक, रविप्रकाश कुलकर्णी, उदय कुलकर्णी आणि अनंत मनोहर यांनी कादंबरीलेखनाविषयीचे विचार व अनुभव मांडले आहेत. अनुराधा नेरुरकर व अरुण नेरुरकर यांचे ललितलेखनही वाचकांच्या ज्ञानात भर घालणारे आहे. किरण हणमशेठ यांनी चितारलेले मुखपृष्ठावरील चित्रही लक्षवेधी आहे.
संपादिका- नीलिमा राजेंद्र कुलकर्णी,
पाने २५६, किंमत- १७५ रुपये
आवाज
खिडकीचित्रे, व्यंगचित्रे आणि हास्यविनोदी साहित्याची परंपरा ‘आवाज’ने यंदाही कायम राखली आहे. यंदाच्या अंकात डॉ. यशवंत पाटील, मुकुंद टाकसाळे, श्रीकांत बोजेवार, सुधीर सुखटणकर, सतीश कदम, मंगला गोडबोले आदींच्या कथा-साहित्यांचा समावेश आहे. यापैकी टाकसाळे यांची ‘अद्भुत वटी’ ही कथा पुण्यातील ‘एफटीआयआय’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून उडालेल्या वादंगावर अप्रत्यक्ष भाष्य करत राजकारण्यांना चिमटे काढते. याशिवाय प्रभाकर वाईरकर, पुंडलिक वझे, सुरेश सावंत, निलेश जाधव, श्रीनिवास प्रभुदेसाई यांची कथाचित्रे तसेच विकास सबनीस, मंगेश तेंडुलकर, सुरेश सावंत, विवेक मेहेत्रे यांची हास्यचित्र मालिका वाचकांसाठी चांगली करमणूक ठरेल.
संपादक: भारतभूषण पाटकर
पृष्ठे : २३६ किंमत: १८० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा