कालनिर्णय
सीरिया आणि येमेनवर सौदी अरेबियाने केलेले अमानुष बॉम्बहल्ले आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतर करणारे निर्वासित, भौतिक सुखाच्या अतिरेकामुळे मर्यादित निसर्गसंपत्तीची होणारी अविरत हानी, त्याचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम, त्यामुळे ढासळणारे निसर्गचक्र, वाढणारे तापमान, अवकाळी पाऊस, अन्न व पाण्याची भीषण टंचाई या बदलत्या जगाचे भान ठेऊन यंदाचा कालनिर्णय दिवाळी संपादीत करण्यात आला आहे.
अतुल देऊळगावकर यांच्या खेळ मांडियेला नव्या वाळवंटी मृगजळ आले भाळी रे या लेखातून दुष्काळी परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध लेखक वेद मेहता, संगीतकार अमित त्रिवेदी यांच्या मुलाखतींमुळे अंक वाचनीय ठरला आहे. भारतकुमार राऊत, माधव आपटे, किरण खलप, गणेश मतकरी यांचे लेख वाचकांना आकर्षित करणारे आहेत. प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे हास्यनिर्मिती करणारी आहेत.
संपादक : जयराज साळगावकर
किंमत : १०० रुपये.
********
तरुण भारत
अंकाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जीवनचरित्राचा दिलीप करंबेळकर यांनी घेतलेला आढावा. येत्या ११ डिसेंबरपासून बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांला सुरुवात होत आहे. देशी गोवंशाच्या माध्यमातून नवी धवलक्रांती कशी घडविता येईल याबाबत किरण शेलार यांचा माहितीपूर्ण लेख आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला काय दिले? या पद्माकर देशपांडे यांच्या लेखात मेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सरकारवर कौतुकाची थाप आहेच, पण नाशिककर तसेच स्थानिक संस्थांच्या योगदानाचाही ऊहापोह केला आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात ‘गंगाकाठची भागीरथी’ या लेखात त्या ठिकाणच्या परिस्थितीचा लेखाजोखा केशव उपाध्ये यांनी मांडला आहे. यामध्ये नागालॅण्डच्या तेमसुटला अॅमसॉग या तरुणीने घाट स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यावर इतरांच्या साथीतून वाराणसीच्या घाटांचे स्वरूप बदलले.
संपादक : किरण शेलार
किंमत : १५० रुपये.
********
संचार
सोलापूरच्या साहित्यिक वर्तुळामध्ये अग्रणी असलेल्या ‘संचार’चा दिवाळी अंक यंदाही आपल्या लौकिकाला जागला आहे. सर्व विषयांमधील संचार कायम ठेवत मान्यवरांचे वैचारिक लेख, कथा आणि कवितांनी हा अंक सजलेला आहे. चार दणदणीत विषयांवरील परिसंवादांनी हा अंक सजला आहे. सत्तांतरानंतर या परिसंवादामध्ये प्रा. अशोक चौसाळकर, हेमंत देसाई, कुमार सप्तर्षी, रत्नाकर महाजन आणि प्रमोद मुजुमदार यांचे विचार असून, सुधारणांची काटेरी वाट मध्ये डॉ. माधव गोडबोले, नीला सत्यनारायण, जयंत उमराणीकर यांचे विचार वाचायला मिळतात.
संपादक : धर्मराज काडादी
किंमत : ८० रुपये.
संस्कारदीप
संस्कारदीप दिवाळी अंकाने या वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवाव्रती असा थोडासा वेगळा विषय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षण संस्था, शेतीवरील नवीन प्रयोग, वृद्धाश्रम, बेडरिडन पेशंट, मतिमंद अंध मुलांसाठी तसेच ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही संस्थांचा परिचय व त्यांची कार्यपद्धती यावर प्रकाशझोत टाकला आहे. तसेच अशा संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे कार्य करणाऱ्या काही सेवाव्रतींच्या कार्याची थोडक्यात तोंडओळख करून देण्यात लेखक-लेखिका यशस्वी झालेले आहेत. कारण गरजूंसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. या विभागात प्रमोद तेंडुलकर, संदेश सप्रे, संपदा वागळे, सुधाकर लोटलीकर, रश्मी महांबरे, अशोक सिनकर, डॉ. पां. रा. किनरे यांनी सहभाग घेतला आहे. तसेच रमेश झवर व नागेश केसरी यांनीही या विषयानुषंगाने लिहिलेले लेख उल्लेखनीय आहेत. त्याच विषयावर आधारित विजय कदम यांनी मुखपृष्ठ सजविले आहे. गिरिजा कीर, विजय साखळकर, माधवी कुंटे, सौ. शैलजा सु. कामत यांच्या बहारदार कथा आणि उमााकांत कीर, शशिकांत साखळकर, गुरुनाथ तेंडुलकर, बाबू मोशाय, पद्माकर द. कार्येकर यांचे विविध विषयावरील लेख वाचनीय आहेत. किशोर रांगणेकर, सौ. मेधा श्रीश कामत, उमाकांत कीर, सौ. शैलजा स. कामत, प्रदीप मौर्य, दीपा सावरगावकर यांच्या कवितांचा समावेश आहे. अंक देखणा व वाचनीय आहे.
संपादक : प्रमोद तेंडुलकर
किंमत : ८० रुपये.
********
जनस्वास्थ्य
‘जनस्वास्थ्य’ हा यंदाचा दिवाळी अंक ‘स्त्री-पुरुष नातेसंबंध’या व्यापक विषयावर आधारित आहे. या अंकात पतीपत्नी यांच्यातील नात्यावर विविध अंगाने चर्चा करण्यात आली आहे. डॉ. अनिल मडके यांनी निमित्त नातेसंबंधाचे या लेखाद्वारे नातेसंबंधांच्या इतिहासापासून विविध बाजूंनी लिखाण केले आहे. डॉ. विठ्ठल प्रभू यांनी स्त्री-पुरुष लैंगिकता या लेखात लैंगिकतेवरील अत्यावश्यक माहिती दिली आहे. या लेखातून त्यांनी सुक्ष्म माहिती दिली आहे. डॉ. उर्मिला चाकूरकर यांनी पुरुष-स्त्री : स्वातंत्र्य की स्वैराचार या लेखातून पुरुष आणि स्त्रियांच्या विचारातील विविध पैलूंची माहिती दिली आहे. डॉ. रोहिणी तुकदेव यांनी बलात्काराची मानसिकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, प्रज्ञा पवार, वसंत केशव पाटील यांच्या कवितांमुळे अंक अधिक वाचनीय ठरला आहे.
कार्यकारी संपादक : डॉ. तारा भवाळकर
किंमत : १५० रुपये.
********
स्वातंत्र्यवीर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाच्या ‘स्वातंत्र्यवीर’ या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. सावरकर प्रणित हिंदूराष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रवास, सावरकर एक असामान्य रसायन या लेखांमधून सावरकर यांचा राष्ट्राभिमान मांडण्यात आला आहे. शंकर गोखले यांनी मोदींचा राष्ट्रधर्म या लेखातून केंद्र सरकारला उपदेश केला आहे. बांगलादेशी घुसखोरी, अमेरिकेत जाण्यापूर्वी असे अन्य विषयही या अंकातून हाताळण्यात आले आहेत.
संपादक : शंकर गोखले
किंमत : ८० रुपये.
दिवाळी अंकांचे स्वागत..
प्रसिद्ध लेखक वेद मेहता, संगीतकार अमित त्रिवेदी यांच्या मुलाखतींमुळे अंक वाचनीय ठरला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 01-12-2015 at 03:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali magazines released