ऋतुरंग
आत्मकथनांची अरभाट मोट बांधून वाचन असोशी असलेल्या ग्रंथोपासकांना भारवून टाकणारे साहित्य देण्याची परंपरा ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाने जपली आहे. या दिवाळी अंकांना आणि त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या ग्रथांना गाजण्याचे वरदान लाभले आहे. यंदा त्रिं. ना. आत्रे यांच्या ‘गाववाडा’ पुस्तकाचे शताब्दी वर्ष या अंकाने साजरे केले आहे, आपल्या नेहमीच्या सकस निर्मितीचा वसा जपत समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून आपल्या मनातील गावाचा धांडोळा या अंकात शब्दचित्रित करून घेण्यात आला आहे. गुलजार, गिरीश कुबेर, विश्वास पाटील, सुशीलकुमार शिंदे, मकरंद अनासपुरे, अरुण साधू, सयाजी शिंदे, श्रीकांत बोजेवार, यशवंतराव गडाख, ऊर्मिला पवार आदींनी आपापल्या गावाच्या जपलेल्या स्मृतींचा उत्सव येथे केला आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी ‘गाववाडा’च्या शताब्दीवर्षांनिमित्ताने लिहिलेला लेखही आवर्जून अनुभवावा असा आहे.
संपादक, अरुण शेवते,
पृष्ठे २५४ , किंमत : २०० रुपये.
पुणे पोस्ट
अल्पावधीत राज्यभरातील ललित साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘पुणे पोस्ट’ साप्ताहिकाचा दिवाळी अंक सकस साहित्याचे भांडार उघडून देणारा आहे. कथा, लेख, रिपोर्ताज, कलास्वाद, अनुभव यांच्यासोबत दीर्घ मुलाखतीची मेजवानी अंकाने दिली आहे. बालाजी सुतार, प्रणव सखदेव, लक्ष्मीकांत देशमुख, छाया महाजन, अंजली कुलकर्णी यांच्या कसदार कथा वाचनाची रंगत वाढवतात. दीर्घकथाकार भारत सासणे यांच्या अनुयायांनी त्यांच्या आजवरच्या अनेक मुलाखती आणि संवादसाहित्य वाचले असेल. त्यांच्यासाठी संवादाचा एक नवा प्रकार या अंकात पाहायला मिळतो.
चंद्रकांत भोंजाळ, राजेंद्र मंत्री, मिलिंद जोशी या लेखक-वाचक त्रिकुटाने घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून सासणेंच्या कथाकार व्यक्तिमत्त्वाचे नवे पैलू उलगडतील. वसंत आबाजी डहाके, महेंद्र मुंजाळ, माधव कर्वे, मनोहर सोनवणे, प्रभा गणोरकर, रंगनाथ पठारे यांचे लेख आहेत.
संपादक : मनोहर सोनवणे
पृष्ठे : १८२, किंमत : १२० रुपये.
समांतर भाग्य
बडोदासारख्या शहरात मराठी साहित्याची पणती तेवत ठेवणाऱ्या ‘समांतर भाग्य’ या अंकात देशभरातून कथा स्पर्धेसाठी लिहिलेल्या मराठी लेखकांच्या विजयी झालेल्या कथा आहेत. यात उज्ज्वला केळकर, सर्वोत्तम सताळकर, सुवर्णा केळकर, मुकुंद नवरे, शरद पुराणिक यांच्या कथा अंकाचे वैशिष्टय़ आहे.
त्यासोबत अमृता प्रीतम, स्वयंप्रकाश, हिमांशी शेलत आदींच्या अनुवादित कथाही वाचनीय झाल्या आहेत. रॉबर्ट ब्राऊनिंग यांच्या ‘माय लास्ट डचेस’ या दीर्घ काव्याचा स्वैर अनुवाद सावन धर्मापुरीवार यांनी केला आहे. रजनी साबरे यांचा पायराकार्डवरचा लेख आणि जुई कुलकर्णी, वसुधा केळकर, आसावरी काकडे आदींच्या कविता सकस साहित्य व्यवहार या अंकात डोकावतो.
संपादक : अनिल लक्ष्मण राव
पृष्ठे ९२ , किंमत ६० रुपये.
अवयव दान विशेष
गेली काही वर्षे समाजात अवयव दानाविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊ लागली आहे. या विषयाचे महात्म्य विषद करणाऱ्या विविध विषयांच्या लेखांचा समावेश यंदा ‘साप्ताहिक आहुति’ने त्यांच्या सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंकात केला आहे. प्रा. रेखा मैड, प्रशांत असलेकर, मंजिरी आठवले, डॉ. राहुल चौधरी, चेतना झांजे, शुभांगी लेले, गुणवंत पाटील आदींचे अवयव दानाविषयीचे लेख या अंकात आहेत. ‘मरावे परि अवयव रुपी उरावे’ असा संदेश देणारे अनिल डावरे यांचे मुखपृष्ठ उल्लेखनीय आहे.
साप्ताहिक ‘आहुति’
पृष्ठे- १५५, संपादक-गिरीश वसंत त्रिवेदी