दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (डीएमआयसी) हा औद्योगिक पट्टा औरंगाबादमध्ये आणण्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे सरसावले आहेत. दुसरीकडे या औद्योगिक पट्टय़ासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा सांगतात. महायुतीच्या पत्रकार बैठकीत श्रेय नक्की कोणाचे, असा प्रश्न विचारल्यावर ‘सीपॅट’ प्रकल्प कसा आणला, याची माहिती खासदार खैरे यांनी दिली आणि या औद्योगिक पट्टय़ासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. दाव्याच्या पुष्टय़र्थ केंद्रातील एका अधिकाऱ्याबरोबर प्रयत्न केल्याचे सांगत ते म्हणाले, ‘दिल्लीत जाऊन आम्ही काय झोपा काढल्या नाहीत.’ मात्र, श्रेय खरे कोणाचे, हे सांगण्याचे त्यांनी पद्धतशीरपणे टाळले. खासदार खैरे व रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी येथे पत्रकार बैठक घेतली.
लोकसभेच्या औरंगाबाद व जालना मतदारसंघांतील उमेदवारांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार बैठकीत खैरे यांनी मराठी व अधूनमधून हिंदी भाषेतही टोलेबाजी केली. धार्मिक स्थळांना मदत करण्यापलीकडे खैरे यांनी काहीच विकास केला नाही, अशी ओरड विरोधक करीत असतात. त्यावर खासदार म्हणून म्हणणे काय, असे विचारले असता खैरे यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर औरंगाबादमध्ये आणण्यात महत्त्वाची कामगिरी केली असल्याचे सांगितले. जो विकास झाला तो माझ्यामुळे, असेही ते म्हणाले. जो दावा खैरे करतात, तोच शिक्षणमंत्री दर्डाही करतात. नक्की कोणाचा दावा खरा, असा प्रश्न झाला आणि खैरे जरा त्राग्यानेच म्हणाले, ‘विकास मीच केला. डीएमआयसीसाठी मी खूप प्रयत्न केले. ‘सीपॅट’ प्रकल्पही माझ्यामुळेच औरंगाबादला आला.’
दावा डीएमआयसीच्या श्रेयाचा असल्याने त्यात सहभाग कसा, असे सांगण्याऐवजी डीएमआयसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर संपर्कात होतो. त्यामुळेच हा प्रकल्प आल्याचे ते म्हणाले. नेमके श्रेय कोणाचे व ते कसे याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. खासदार दानवे म्हणाले, की जालना लोकसभेसाठी काँग्रेसने दिलेला उमेदवार परजिल्हय़ातील आहे. ते औरंगाबाद जिल्हय़ाचे हर्सूलचे रहिवासी आहेत. महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार काँग्रेसने मैदानात उतरविला आहे. तिकीट घ्या, असा आग्रह काँग्रेसला करावा लागला व कोणीच तयार नसल्याने एकाला उभे केले. मतदारसंघात पंतप्रधान सडक योजना व धरणांची कामे हाती घेतल्याचाही दावा त्यांनी केला. विकास केला नाही, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. मात्र, सत्तार यांच्याविषयी आता काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी ‘भरपूर’ विकासकामे केल्याचा दावा केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, श्रीकांत जोशी, सुहास दाशरथे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा