जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टीच्या काळात विद्यार्थी नसताना पोषणआहार देण्यात आला. तसेच पोषण आहारातील तांदूळ व डाळींचे वजन कमी आणि मालही निकृष्ट दर्जाचा असल्याने पोषण आहारात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला, असा आरोप शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केला. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या तीन दिवसांपासून िहगोलीच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समिती सदस्यांची आमदार डॉ. मुंदडा यांनी भेट घेतली. जि. प. सभागृहात आयोजित पत्रकार बठकीत बोलताना त्यांनी जिल्ह्यातील पोषणआहारात होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती दिली. जि. प.चे उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, शिक्षण सभापती अशोक हरण आदींची उपस्थिती होती.
कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळातही पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारने िहगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केलाच नाही. दुष्काळसदृश जिल्हा एवढीच त्याची नोंद आहे. जिल्ह्यात दि. १ मेपासून शाळेला सुट्टय़ा लागल्या. मात्र, विद्यार्थी शाळेत हजर नसतानाही पोषण आहार शिजविला गेला. तो इतरांना खाऊ घातल्याचा आरोप डॉ. मुंदडा यांनी केला. पंचायत राज समितीचा दौरा जिल्ह्यात सुरू असल्याने शाळेतील पोषण आहाराविषयी माहिती घेण्याचे पत्र जि. प. प्रशसानाला दिले होते. वसमत तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी पेडगावकर यांनी २३ जूनला शाळांना भेटी देऊन माहिती गोळा केली. नहाद, सतिपांगरा, टेंभुर्णी, पुयीणी आदी शाळांना भेटी देऊन ही माहिती जमा केली. त्यावर अनेक शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्हते, तर पोषण आहारातील तांदूळ व तूर डाळीच्या ५० किलोच्या गोण्यांतून ५ किलो माल कमी आढळून आला. टेंभुर्णी येथे एका गोणीत ३५ किलो तुरीची डाळ भरली. पुयीनीला एका गोणीत २० किलो माल आढळून आला, अशा बाबी डॉ. मुंदडा यांनी या वेळी निदर्शनास आणल्या.
पोषण आहार योजनेतील ही स्थिती लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून ही योजना केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक, कुपोषण दूर करण्यासाठी पोषण आहार योजना चालू करण्यात आली. परंतु कुपोषित मुलांची आकडेवारी पूर्वीच्या तुलनेत वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. अंगणवाडीसाठी खरेदी केलेले स्टिलची ताटे अजून अंगणवाडीपर्यंत पोहोचलीच नसल्याचे सांगून या प्रकरणी जि. प. प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोषण आहारातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची व दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुरवठा केलेला माल कमी असल्याने कमी मालाची भरपाई कंत्राटदारांकडून करावी, असेही डॉ. मुंदडा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा