महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांना घ्यावे की नाही? यावरुन बराच खल झाला. प्रकाश आंबडेकर यांनी तीनही पक्षांच्या नेत्यांनी वंचितला सोबत घ्यायचे असेल तर तसे लेखी निवेदन द्यावे, असे म्हटले होते. प्रकाश आंबेडकर अखेर मविआत आले खरे, पण आता जागावाटपावरून त्यांचा मविआच्या नेत्यांशी विसंवाद असल्याचे दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत केला आहे. ज्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना हजेरी लावू नये, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये.”

प्रकाश आंबेडकरांवरून महाविकास आघाडीत फूट? नेत्यांमध्ये मतभेद? संजय राऊत म्हणाले…

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले आहेत, तरीही मविआमधील प्रमुख चारही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झालेले पाहायला मिळत नाही. वंचित बहुजन आघाडी मविआ नेत्यांसमोर सातत्याने वेगवेगळ्या अटी-शर्थी मांडत आहे, वंचितकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. तसेच वंचितचे प्रतिनिधी मविआच्या बैठकांमध्ये वेगवेगळे प्रस्ताव ठेवत आहेत. यावरून मविआचे नेते आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबत केलेली वक्तव्ये पाहता मविआमधील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे.

खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, येत्या ६-७ मार्च रोजी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरदेखील सहभागी होतील. कोणाला वाटत असेल की मविआमध्ये फूट पडली आहे किंवा आमच्यात काही मतभेद आहेत, तर मी स्पष्ट करू इच्छितो की, तसं काहीच नाही. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्यासह पुढे जाणार आहे आणि देश बदलण्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर अग्रेसर असतील. भाजपा सरकार उलथून टाकण्यात आंबेडकरांचा मोठा सहभाग असेल.

“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

..तर आम्ही संघ – भाजपाबरोबर जाऊ

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनीही दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. “देशात जातीवर आधारित पुरोहितशाही चालली आहे, ती कायद्याने पूर्णपणे बंद करायला हवी. यावर सरकारने बंदी घालायला हवी. त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी (ब्रह्मज्ञान) उभं केलं जावं आणि तिथून शिकून, उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे. धार्मिक विधी त्यांच्यामार्फतच केले जायला हवेत. आरएसएस आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू शकतो”, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not attend mva meeting prakash ambedkar appeal to vanchit bahujan aghadi activist kvg
Show comments