दलित ऐक्य यापूर्वी अनेकदा झाले, पण ते तोडण्याचे काम काही दलित नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी केले. लाभासाठी दुसऱ्याच्या दावणीला बांधून घेतले. त्यामुळे आता दलित ऐक्यावर समाजाचा विश्वास राहिला नाही, असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.
प्रियदर्शनी मंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात कवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष गोपाळ अटोटे हे होते. या वेळी जयदीप कवाडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे, जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, संतोष मोकळ हे उपस्थित होते.
कवाडे म्हणाले, नगर जिल्हय़ातील महार वतनाच्या जमिनी काही पुढाऱ्यांनी बळकावल्या आहेत. त्या दलितांना विनाअट परत केल्या पाहिजे. नगर जिल्हय़ात दलित अत्याचाराच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असून तो जिल्हय़ाला लागलेला एक कलंक आहे. तसेच दलितांच्या संरक्षणासाठी असलेला अॅट्रॉसिटीचा कायदा हा नखे नसलेल्या वाघासारखा आहे. ज्याने दलितांचे संरक्षण होत नाही. त्याकरिता कायदा आणखी कडक करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे, नरेंद्र दाभोलकर व कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातन संस्था आहे. सनातनच्या समीर गायकवाडला अटक करण्यात आली. ही संस्था देशहिताचे काम करत नसून सैतानी कृत्य करत आहे. त्यामुळे सनातनवर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा