माध्यमांची ताकद व क्षमता मोठी असली तरी माणसे त्याच्या आहारी जाऊन स्वत:ची बुद्धी गहाण ठेवतात, विचार करण्याची क्षमता गमावून बसतात. त्यामुळे माध्यमप्रवण बनून त्याचा उपभोग घेण्यापेक्षा वापर करण्याचे समाजाने शिकले पाहिजे, असे आवाहन अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.
पत्रकार विकास अंत्रे लिखित व संस्कृती प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘कथा अंधारातल्या दिव्यांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर अशोक तुपे होते. या वेळी संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनीताराजे पवार, नरेश राऊत फाऊंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोर्डे आदी उपस्थित होते.  
अभिनेते कुलकर्णी म्हणाले, नवीन माध्यमांचे आगमन होत आहे. त्यांची ताकद व क्षमता जशी मोठी आहे, तशीच त्यांच्यात गळेकापू स्पर्धा आहे. त्यामुळे मूल्य नसलेल्या अर्थहीन बातम्या दिल्या जातात. वाहिन्यांवर अहोरात्र बुवाबाबांचा संचार दिसतो. ते लोकांना शिकवतात, दृक्श्राव्य माध्यमे विचार करण्याची क्षमता कमी करतात. सामान्य माणसावर त्यांचे संस्कार होतात. माहितीचा आज स्फोट झाला असून माध्यमे माणसांच्या जगण्याचे परिशीलन करतात. जीवनातच सरमिसळ करण्याचे काम केले जाते. संस्कारशीलता त्यामुळे कमी होते. पण आता लोकांनी माध्यमांचा उपभोग घेण्यापेक्षा त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांचा वापर आपल्या पद्धतीने केला पाहिजे. स्वतंत्र विचारक्षमता तरच टिकू शकेल, असे ते म्हणाले.
समाजात ‘काहीतरी केले पाहिजे’ या विचाराने काही माणसे जगतात आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवतात तीच माणसे अंत्रे यांच्या पुस्तकात आहेत. समाजासाठी काम करणाऱ्यांनी जगण्याचे तत्त्वज्ञान कृतीत उतरवले म्हणून या पुस्तकातील प्रत्येक माणसाची गोष्ट मनाला भावते, असे गौरवोद्गारही कुलकर्णी यांनी काढले.
या वेळी सुनीता राजे, तुपे, अंत्रे, प्रा. गोर्डे, मनोज आगे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते धनंजय कानगुडे, स्वागत पत्रकार करण नवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ तर आभार पत्रकार रवि भागवत यांनी मानले. या वेळी माजी आमदार जयंत ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेविका भारती कांबळे, विजय कोते, साहेबराव घाडगे, विजय बनकर, उद्योजक किशोर निर्मळ, गीतकार बाबासाहेब सौदागर, नामदेवराव देसाई आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पुरोगामी कसा?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. दाभोलकरांबद्दल अपप्रचार केला गेला. त्यांचा देवाला विरोध नव्हता. ते कधी कुणाच्या आड आले नाही. तरीदेखील त्यांच्याबद्दल संभ्रम पसरविण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी राज्य कसे म्हणणार, असा सवाल अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केला.