BJP leaders request to RSS : अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकालामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले. अनेक राजकीय ठोकताळे चुकीचे ठरले. निवडणुकीच्या आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपाला संघाची गरज नाही असे म्हटले होते. या विधानावर संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच निकालानंतर महाराष्ट्रात भाजपाला आपल्या अनेक जागा गमवाव्या लागल्या. त्यानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून भाजपाने अजित पवारांशी युती केल्याबाबत टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर अजित पवार गटात काहीशी नाराजी पसरली होती. अजित पवार गट स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले गेले. तर तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांकडून संघाला अजित पवारांवर टीका करण्याची विनंती करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत महायुतीमधील मित्रपक्षांना बरोबर घेत विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे अमित शाह यांनी जाहीर केले. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून दोनवेळा टीका झाल्यानंतर अजित पवार गटा काहीसा नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीवर भाजपाकडून फारशी प्रतिक्रिया आलेली नव्हती.
हे वाचा >> “अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका
मुंबईतील बैठकीत विनंती
आता विविध माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुका महायुतीला एकत्र लढवायच्या आहेत, त्यामुळे अजित पवारांवर टीका टाळा, अशी विनंती भाजपा नेत्यांनी संघाच्या नेत्यांकडे केल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी आणि वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
हे ही वाचा >> “भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…
अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी महायुतीत सामील करून सत्तेत वाटा देण्यात आला होता. मात्र या युतीचा लोकसभा निवडणुकीत मतांच्या स्वरुपात फारसा लाभ झाला नसल्याचे भाजपा आणि संघाच्या काही नेत्यांचे मानने आहे. स्वतः अजित पवार यांच्या गटाला चार पैकी एकच जागा जिंकता आली. तसेच राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या निलेश लंके, बाळ्या मामा म्हात्रे, बजरंग सोनवणे अशा काही उमेदवारांनी भाजपाच्या खासदारांचा पराभव केला.
झी २४ तासने दिलेल्या बातमीनुसार, मुंबईत संघ आणि भाजपामध्ये झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत संघाने सहकार्य करावे, अशीही विनंती भाजपा नेत्यांनी केल्याचे सांगितले जाते.