धवल कुलकर्णी
करोनाचे संकट घोंघावत असताना आणि टाळेबंदी सुरू असताना मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेला रमजानचा महिना आला आहे. मात्र रमजानमध्ये लोकांनी मशिदीत जाऊन प्रार्थना करू नये आणि फळे व भाजीपाला घ्यायला फक्त विशिष्ट वेळेतच बाजारात जावं असं आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
औरंगाबादचे खासदार असलेले जलील यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला माहिती दिली की सोमवारी त्यांची जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक झाली आणि त्यात असे ठरवण्यात आले ही लोकांना फक्त विशिष्ट वेळेतच बाजारामध्ये जाऊन रोजा उघडण्यासाठी फळे किंवा भाजीपाला घेता येईल. लोकांना दिवसा भाजीपाला खरेदी करता येईल आणि संध्याकाळी फळे.
लोकांनी मशिदीत जाऊन सामूहिक प्रार्थना करू नये आणि याबाबत देशातील अनेक वरिष्ठ मौलाना व मुफ्ती यांनी सुद्धा आवाहन केले आहे. त्याचबरोबर बोर्डाने सुद्धा असे सांगितले आहे की मशिदीत सामूहिक प्रार्थना करू नये व प्रार्थना ही घरातच करावी.
त्याचसोबत इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की एकूणच कारोणा व्हायरस चे संकट आणि सध्या सुरू असलेले लॉकडाउन लक्षात घेता लोकांनी सामूहिक प्रार्थना करू नये आणि खरेदीसाठी घराबाहेर पडायचे ठरवले तर ते विशिष्ट आखून दिलेल्या वेळेतच करावे.