सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण आणि राजेमंडळींची नाराजी वगैरे काही नसून, थोडीफार नाराजी राहतेच. मात्र, लवकरच आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र दिसू, असा विश्वास सातारा जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. माध्यमांनी राजेमंडळींच्या नाराजीमधील दरी वाढवू नये अशी विनंती त्यांनी केली.
जलसंपदा खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर मोठय़ा डामडौलात आलेल्या शशिकांत शिंदे यांची कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा घाटापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. येथे दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी आवर्जून संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरेंद्र पाटील आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
पालकमंत्री म्हणून काम करताना सर्वसामान्यांना न्याय देण्यास प्राधान्य देणार आहे. शासन व प्रशासनात सुयोग्य समन्वय साधून लोकाभिमुख व विकासाच्या कामांना गती देण्याची भूमिका व्यक्त करून शशिकांत शिंदे म्हणाले, की शरद पवार, अजित पवार व आमदार सहकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यास आपण कटिबद्ध आहोत. मिळालेल्या संधीस पात्र राहून भरघोस काम उभारू. समाजहिताच्या आणि विकासाच्या कामांची शासन अन् प्रशासन दरबारी खंबीरपणे उभा राहून पाठपुरावा करू. अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कामकाजाचा पदभार स्वीकारला असून, अजून कामास सुरुवातही केलेली नाही. या खात्याचे रामराजे निंबाळकर यांनी बऱ्याच काळ काम पाहिले आहे. तरी, प्रथम त्यांच्याशी बोलणार आहे. उपलब्ध अनुशेषाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील कामांना प्राधान्य देऊ, दुष्काळी भागात कामे हाती घेतली जातील असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचनाला गती देण्याची भूमिका घेतली असल्याने यासंदर्भात शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देतील व त्यासाठी शासन, प्रशासन सहकार्याची भूमिका घेईल यासाठी आपण संवेदनशीलपणे प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील आघाडी शासनामध्ये झाले गेले विसरून एकत्र काम करण्याचे ठरले आहे. तशी नेत्यांमध्ये चर्चाही झाली असून, आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात येणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. कराड विमानतळ विस्तारवाढीस आपण विरोध केला होता. मात्र, आता आपण जनतेचे प्रतिनिधी असण्याबरोबरच शासनाचेही प्रतिनिधी आहोत अनुषंगाने विमानतळ विस्तारवाढप्रश्नी केवळ भांडण्याऐवजी आता यासंदर्भात सभागृहात भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. उरमोडी प्रकल्पातून खटाव तालुक्यातील १६ गावांना पाणी मिळावे म्हणून अजित पवारांना शिष्टमंडळ भेटले असून, पवारांनी भेटलेल्या शिष्टमंडळास पाणी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तरी आपली भूमिका काय अशी विचारणा केली असता संबंधित प्रशासन व शिष्टमंडळासमवेत तत्काळ बैठक घेतली जाईल. अजितदादांच्या भूमिकेस निश्चितच प्रतिसाद दिला जाईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा