मराठा समाजासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरुच आहे. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशी त्यांची ठाम भूमिका आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरु केलं आहे. आम्ही ओबीसी समाजाला शत्रू मानत नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसंच ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“आम्ही विधानसभेची तयारी करायला लागलो आहोत. लोकसभेचा जो विजय झाला आहे त्याचं कवित्व आम्ही थांबवलं पाहिजे. खूप शांतपणे विधानसभेची तयारी केली पाहिजे. विधानसभेची व्यूहरचना, जागावाटप, काही जागांचं टार्गेट करणं, जागावाटपाचा फॉर्म्युला या गोष्टी आम्ही ठरवत आहोत. काही जागा समजुतीने बदलणं यावर आमच्या चर्चा सुरु आहेत.” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसंच मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनावरुन त्यांनी सरकारला सल्ला दिला आहे.

मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करु नये

मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आंदोलन असेल दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी करु नये. कारण सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि सांगतात की तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत. तेच सत्ताधारी ओबीसी आंदोलकांना सांगत आहेत की तुमच्याही मागण्या पूर्ण होतील. एकाच म्यानेत दोन तलवारी कशा राहू शकतील? मला वाटतं की सरकारची नियत चांगली असेल तसंच जाती-धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांना समोरासमोर बसवावं. त्यांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने मार्ग शोधला पाहिजे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”

मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके अशी टीका

ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान, आज हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील काही वेळापूर्वी म्हणाले होते की “मी आता मराठ्यांबरोबर दलित आणि मुस्लिम समाजांची मोट बांधणार आहे. त्यानंतर आणखी तीव्रतेने लढाई लढणार आहे”. जरांगे यांच्या या वक्तव्यावर लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं. हाके म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मुसलमानांची मतं चालली, परंतु इम्तियाज जलील चालले नाहीत. तुम्हाला दलितांची मतं चालली, परंतु तुम्ही आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना स्वीकारलं नाही. त्यामुळे दलित आणि मुस्लिमांची मोट बांधण्याच्या गप्पा तुम्ही मारू नका. दोन्ही नेत्यांमध्ये अशी टीका सुरु आहे. अशात सुषमा अंधारेंनी समन्वय साधून सरकारने मार्ग काढावा असं म्हटलं आहे.