देश विकणा-यांपेक्षा चहा विकणा-याच्या हातामध्ये देश सोपवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
नगर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या येथील प्रचाराच्या सांगता सभेत फडणवीस बोलत होते. गांधी यांच्यासह आमदार राम शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, कैलास शेवाळे, शांतिलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, शिवसेना नेते अमृत लिंगडे आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. आज देशात महागाई, भ्रष्टाचार, शेतक-यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. अरुणाचलवर चीन हक्क सांगत आहे, तरीही पंतप्रधान मौन सोडण्यास तयार नाहीत. देशाला आता नरेंद्र मोदींसारख्या कणखर पंतप्रधानाची गरज आहे. त्यासाठी मतदारांनी गांधी यांना निवडून द्यावे असे आवाहन फडणवीस यांनी केले. सोनिया व राहुल यांच्यासह काँग्रेसवरही त्यांनी या वेळी जोरदार टीका केली.
गांधी म्हणाले, कर्जत तालुक्यातील जनतेने मला फार प्रेम दिले आहे. त्यांच्यामुळेच मी दोनदा खासदार झालो. याही वेळी कर्जतकर भाजपच्या पाठीशी उभे राहतील याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले व पक्षाने सर्व दिले तेच आज माझ्यावर व पक्षावरही टीका करतात, त्यांना जनताच धडा शिकवील असे ते म्हणाले. आमदार राम शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांमधून गांधी यांना मोठी आघाडी देऊ असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

Story img Loader