नक्षलवादविरोधी मोहिमेत सहभागी झालेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आदिवासींची संस्कृती, रूढी व परंपरा समजून घेतानाच त्यांची मने जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. या जवानांसाठीच्या मानक कार्यपद्धतीत अनेक बदल सुचवणाऱ्या मंत्रालयाने शोधमोहिमेत सामील होणाऱ्या जवानांनी या कार्यपद्धतीचे पालन करावे, असे निर्देश दिले आहेत.
देशातील सहा राज्यांमध्ये सध्या नक्षलवादाची समस्या जटिल बनली आहे. या हिंसक चळवळीचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांचे सुमारे १ लाख जवान या भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या जवानांची वागणूक कशी असावी, याविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मानक कार्यपद्धतीत प्रकाश टाकण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा दले व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची सर्वाधिक झळ या भागातील स्थानिक आदिवासींना बसली आहे. या आदिवासींची मने जिंकल्याशिवाय नक्षलवादविरोधी मोहिमेत यश मिळणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. स्थानिक आदिवासींची मने जिंकायची असतील तर आधी त्यांची संस्कृती, तसेच रूढी आणि परंपरा समजून घेणे आवश्यक आहे. या भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे या निर्देशात नमूद करण्यात आले आहे.
आदिवासी महिला उघडय़ा अंगाने गावाशेजारच्या तलावावर आंघोळ करतात. या महिला ब्लाऊजसुद्धा घालत नाहीत. अशावेळी शोधमोहिमेवर असलेल्या जवानांनी त्यांच्याकडे टक लावून बघू नये, असे मंत्रालयाने बजावले आहे. या महिला आंघोळ करत असलेल्या ठिकाणापासून जवानांनी जाऊसुद्धा नये, असे नव्याने जारी करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीत म्हटले आहे. शोधमोहिमेवर असलेल्या जवानांना गावातील कुणाची चौकशी करायची असेल तर गावातल्या प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत ती करावी, असेही या कार्यपद्धतीत म्हटले आहे. या मोहिमेतील जवानांनी मद्यप्राशन करून गावात जाऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. या भागातील सुरक्षा दलांनी आदिवासींच्या पारंपरिक सणांची माहिती गोळा करावी आणि हा सण ज्या दिवशी असेल त्या दिवशी गावकऱ्यांना शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम आयोजित करावेत, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शोधमोहिमेच्या दरम्यान एखाद्या आदिवासीच्या घराची झडती घ्यायची असेल तर अतिशय काळजी घ्यावी, तसेच त्याने घराला पारंपरिक सजावट केली असेल तर ती विस्कटली जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. सुरक्षा दलांच्या तळावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाजातील ज्येष्ठांना सहभागी करून घ्यावे, प्रसंगी त्यांचा सत्कारसुद्धा करावा, असेही मंत्रालयाने यात म्हटले आहे. मध्य भारतात अलीकडच्या काही घटनांमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक आदिवासी ठार झाले आहेत. त्यामुळे आदिवासींमध्ये सुरक्षा दलांविषयी कमालीचा रोष आहे. तो लक्षात घेऊन आता या दलांसाठी असलेल्या मानक कार्यपद्धतीत मंत्रालयाने बरेच बदल केले असून त्याचे पालन दलांनी करावे, अशा सूचना सर्वत्र देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा