रत्नागिरी : ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन या आगारातील चालक अमित आपटे यांनी एका व्हिडीओद्वारे केले आहे. या गाडय़ांची योग्य देखभाल न केल्याने आगारप्रमुख आमच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असा थेट आरोप करून आपटे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दोन्ही गाडय़ा सतत ब्रेक डाऊन होत असतात. गेल्या २५ दिवसांत त्याबाबत आम्ही चालकांनी अनेकदा तक्रार नोंदवली आहे. पण त्यांची दखल न घेता आमच्यावरच कारवाई केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  आपण हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कारवाई होऊन घरी बसवले जाईल, याची जाणीव आहे. पण अपघात होऊन घरी बसण्यापेक्षा असे घरी बसलेले बरे, अशी टिप्पणी आपटे यांनी केली आहे. प्रवाशांनी या परिस्थितीची गंभीरपणे नोंद घेऊन या बसगाडय़ांनी प्रवास टाळावा, तसेच राज्यकर्त्यांनी या समस्येची गंभीरपणे दखल घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक नागरिकांनीही एसटीच्या कारभाराचे छायाचित्रांसह वाभाडे काढले. देवरुखमधील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली. मात्र आगारप्रमुखांनी तांत्रिक बाबींचा उल्लेख न करता डय़ुटी बदलल्यामुळे संबंधित चालकांनी हा व्हिडीओ बनवला, असा उलट आरोप केला.

दरम्यान, रत्नागिरीतील एसटीच्या विभागीय कार्यालयातून सुरक्षा व दक्षता अधिकारी मकरंद ओटवणेकर, उपयंत्र अभियंत्या निशा जाधव, साहाय्यक सुरक्षा निरीक्षक सतीश शेवडे यांच्या समितीने देवरुखला जाऊन आगारप्रमुख रवींद्र वणकुद्रे व चालक अमित आपटे यांची बाजू ऐकून घेतली. या वेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते. चालक आपटे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती, असे मत व्यक्त करून अशा पद्धतीने व्हिडीओद्वारे महामंडळाची बदनामी करायला नको होती, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. यावर आपले म्हणणे आगारप्रमुखांनी ऐकून घेतले नाही, असा आरोप चालक आपटे यांनी केला.

एसटी महामंडळाचे रत्नागिरी येथील विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी लोकसत्ताला सांगितले की, याप्रकरणी नेमलेली चौकशी समिती आपटे यांच्या तक्रारींबाबत वस्तुस्थिती जाणून घेईल. त्याचबरोबर, आपटे यांच्या वर्तनाचीही दखल घेतली जाईल. या दोन्ही मुद्दय़ांवरील अहवाल सुमारे आठवडाभरात अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. गाडय़ांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होतात, हे खरे आहे. पण ते दूर करून गाडय़ा पुन्हा मार्गस्थ केल्या जातात, असाही दावा बोरसे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not travel on this route by st bus video of the driver ysh
Show comments