राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र पाठवून जनलोकपालसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु सरकार अम्हाला साथ देत नसल्याचे म्हटले आहे. त्यावर हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी ही बाब यापूर्वीच जनतेसमोर का मांडली नाही, जनलोकपालसाठी आंदोलन का केले नाही असा सवाल केला. या पत्रावर आपला विश्वास नाही असे सांगून जेटली यांना उद्या (गुरुवार) पत्राद्वारेच उत्तर देऊ असे हजारे म्हणाले.  
जनलोकपाल विधेयकाबाबत जेटली यांनी बुधवारी हजारे यांना पत्र पाठवून त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यावर हजारे म्हणाले, विरोधी पक्षाचे पक्षनेते म्हणून या विधेयकाच्या मंजुरीसाठी जेटली यांनी प्रयत्न करणे गरजेचे होते. सरकार साथ देत नसेल तर त्यांनी ही बाब यापूर्वीच जनतेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. इतर कोणत्याही प्रश्नांसाठी भाजपा आंदोलन करते, मात्र जनलोकपालसाठी त्यांनी आंदोलन का केले नाही असा सवाल करीत जेटली यांच्या पत्रावर आपला विश्वास नसल्याचे हजारे यांनी सांगितले. याचसंदर्भात हजारे हे गुरुवारी जेटली यांच्या पत्राला लेखी उत्तर देणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी हे येत्या अधिवेशनात जनलोकपाल मंजूर करणार असल्याचे सांगतात. मात्र जनलोकपालसंदर्भातला अजेंडाच अधिवेशनात मांडला गेला नसल्याने हे विधेयक कसे मंजूर होणार असा सवाल करीत हजारे यांनी पंतप्रधान कार्यालय अजूनही देशातील जनतेची फसवणूक करीत आहे असा आरोप केला. याविषयी ते गुरुवारी नारायणसामी यांनाही पत्र पाठवणार आहेत.
केजरीवाल यांनी आपणास कोणताही वैयक्तिक धोका दिला नाही, पक्ष स्थापनेचा त्यांचा निर्णय व्यक्तिगत आहे. केजरीवाल यांनी आंदोलनात सहभागी होण्याची आपली अपेक्षाही नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. या आंदोलनात आपण एकाकी पडलो नसून देशातील जनता आपल्या बरोबर आहे. येत्या दोन दिवसांत याचा देशभरात प्रत्यय येईल असा विश्वासही हजारे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हजारे यांच्या समर्थनार्थ पारनेर तालुका विद्यार्थी कृती समितीच्या वतीने सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा बुधवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयावर नेण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. हजारे यांच्या मागणीवर तातडीने निर्णय न झाल्यास दोन दिवसांनंतर तालुक्यातील सर्व महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
पारनेर महाविद्यालयापासून निघालेल्या या मोर्चात महेश शिरोळे, शैलेंद्र औटी, किरण ठुबे, नामदेव ठाणगे, हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी, सावकार काकडे, संकेत ठाणगे, किरण कोकाटे, निघोजचे सरपंच संदीप वराळ गणेश कावरे, डॉ. नरेंद्र मुळे, कल्याण थोरात आदी सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तेथे तहलीदार जयसिंग वळवी यांना निवेदन देण्यात आले.

Story img Loader