Devendra Fadnavis Answer : महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढीला लागली आहे. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत आहेत महिलांविषयक गुन्हे वाढत आहेत असं म्हणत आज महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी गृहखात्यावर टीका केली. त्यानंतर नागपूरमध्ये कसा क्राईम रेट वाढतो आहे हे देखील आपल्या विधानसभेतल्या भाषणात सांगितलं. त्या सगळ्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
२४ हजारांहून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली. आपण जर फरक पाहिला तर २०२० मध्ये ड्रग्जच्या संदर्भात ५ हजार ३२१ लोकांवर कारवाई झाली. मागच्या वर्षी १३ हजार १२५ लोकांवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाली आहे. एकूण जर आपण पाहिलं तर मी याआधीही सांगितलं की केंद्र सरकारने ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ सुरु केली. ड्रग्ज संदर्भात वेगवेगळी राज्ये कारवाई करतात. राज्यं एकमेकांना माहिती देत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरणात लोक पकडले जात आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “रामाचा आदर्श सांगता पण सीतेचं रक्षण…”, जयंत पाटील यांचा सवाल, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे..
जयंत पाटील हे गृहमंत्री होते. NCRB हा अहवाल कसा वाचतात हे त्यांना माहीत असेल असं वाटलं होतं. राजकीय बोलायचं असेल किंवा हा अहवाल कसा वाचतात ते माहीत नाही. मी ललित पाटीलच्या संदर्भात पत्र वाचून दाखवलं. कृष्ण प्रकाश यांनी लक्षात आणून दिलं होतं त्यावर त्यावेळच्या राज्य सरकारने उत्तरच दिलं नाही. गेल्या दोन-तीन अधिवेशनांमध्ये हरवलेल्या मुली, स्त्रिया यांचा विषय येतो आहे. तो विषय असा आणला जातो आहे की हे सरकार आल्यावरच या गोष्टी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातून निघून गेली तर अपहरण ही नोंद घ्यावी लागते. पण परत येण्याचं प्रमाणही तेवढंच आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ४ हजार मुली, ६४ हजार महिला बेपत्ता होतात. मात्र मुलींच्या परत येण्याचं प्रमाण ९० टक्के आणि महिलांच्याबाबतीत ते प्रमाण ८६ टक्के आहे. अशी परिस्थिती इथे नाही की इथेच होतं आहे. पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांच्या तुलनेत आपली स्थिती बरी आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीत गेला आहे असं NCRB च्या अहवालावर सांगितलं जातं. मला माध्यमांनाही सांगायचं आहे. यात दोन गोष्टी असतात एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी. प्रति लाखांमागे किती गुन्हे घडले ते पण असतं. मुंबई आणि दिल्ली यांचा विचार केला तर मुंबईत रात्री १२ वाजताही मुली सुरक्षितपणे फिरु शकतात. राजधानी दिल्लीत ती परिस्थिती नाही. बलात्काराच्या बाबतीत महाराष्ट्राचा १६ वा क्रमांक लागतो. एकही बलात्कार होऊ नयेच. कुठल्याही बलात्काराचं समर्थन होऊच शकत नाही. पण जे काही चित्र रंगवलं जातं आहे की इथेच बलात्कार वाढले हे चुकीचं आहे.
दंगलीचे गुन्हे कसे दाखल होतात?
महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित हे माध्यमांमध्ये वाचायला मिळतं पण ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्राची तुलना कुणीतरी बिहारशी केली त्यातही तथ्य नाही. जयंत पाटील यांनी मगाशी दंगलींचा विषय मांडला मी त्यांना सांगू इच्छितो दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये दोन प्रकार असतात. एक असते धार्मिक दंगल आणि एक असते चार ते पाच माणसांचं कुठल्याही कारणावरुन भांडण, वाद झाला तर दंगलीचा गुन्हा दाखल होतो. तुम्ही (जयंत पाटील ) जे आकडे वाचले ते सगळे धार्मिक दंगलींचे नाही. महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं हाताळण्यासाठी आपण २७ विशेष न्यायालयं आणि ८६ जलदगती न्यायालयं तयार केली आहेत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.दंगलीच्या संदर्भात मी हे सांगू इच्छितो, माननीय जयंत पाटील २०२० मध्ये दंगलीचे ९ हजार १५७ आताची संख्या ८ हजार २१७ पण दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये पाच टक्के घट आहे. हे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत. जमावाने केलेले गुन्हे आहेत.
नागपूरवर काही लोकाचंं विशेष प्रेम
नागपूरवर काही लोकांचं विशेष प्रेम आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून नागपूरवरचं अनेकाचं प्रेम उफाळून येतं आहे. या शहराला बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात. सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे की NCRB रिपोर्टमध्ये २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाते. जोपर्यंत नवी जनगणना होत नाही तोपर्यंत ही लोकसंख्या धरली जाते आहे. तीन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चार लाख लोक येतात त्यांची संख्या जनगणना झाली नसल्याने गृहीत धरली जात नाही. २०२१ मध्ये नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर होता आता नागपूर आठव्या क्रमांकावर आहे. तो खरं म्हणजे लोकसंख्येच्या घोळामुळे २२ किंवा २३ व्या क्रमांकावर आहे. नागपूरला क्राईम सिटी, गुन्हे वाढलेत हे म्हणून नागपूरमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीला कुणी खोडा घालू नये असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महिलांवरचे गुन्हे, खून, घरफोड्या, बलात्काराच्या घटना यांमध्येही घट झाली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतं जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम केलं जातं आहे. मी आपल्याला आणि आपल्या मार्फत माध्यमांना विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं थांबवावं. नागपूर पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ४४३ आरोपींना अटक केली आहे. नागपूर गुन्हे शाखेने नार्को पोलीस युनिटही तयार केलं आहे. मुली बेपत्ता झाल्या ही बातमीही नागपूरच्या बाबतीत आली. माहे ऑक्टोबरपर्यंत ३३८ मुली बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं. त्यातल्या ३२६ परत आल्या आहेत उर्वरित बारा मुलींचाही शोध नागपूर पोलीस घेत आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.