सांगली : उत्सवादरम्यान होणारे ध्वनी प्रदुषण आणि तीव्र प्रकाश झोताचा वापर सौम्य करण्यासाठी मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ एकत्रित आले आहेत. उत्सवातील तीव्र ध्वनी आणि लेसर किरणांचा मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने विचारमंथन झाले.
आयएमए मिरज शाखेचे अध्यक्ष डॉ. नथानियल ससे व सचिव डॉ.जीवन माळी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तीव्र ध्वनींचा कर्णपटलावर होणारा परिणाम यावर डॉ. शशिकांत दोरकर, लेसर किरणांचा डोळ्यावर होणारा परिणाम यावर डॉ. शरद भोमाज, ध्वनींचा ह्दयावर होणारे परिणाम यावर डॉ. अजित जोशी यांनी दृष्यफितींच्या माध्यमातून माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या ध्वनीं आणि लेसर किरणांची सर्वोच्च पातळी उत्सवादरम्यान असते. यामुळे अनेक रूग्ण श्रवण क्षमता कमी झाल्याच्या आणि डोळ्यात आग होत असल्याच्या तक्रारी करीत उपचारासाठी येत असल्याचे दिसून आल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >>> “बिनबुडाच्या आरोपांना भीक घालत नाही”, ‘त्या’ प्रकरणावरून उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये ४५ सार्वजनिक मंडळांच्या ध्वनींचे मोजमाप केले असता यापैकी ३५ मंडळांच्या ध्वनींची मर्यादा ओलांडली असल्याचे आढळून आले आहे. या मंडळांना कायदेशीर खुलासा करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, उत्सव काळात ध्वनी मर्यादांचे पालन करण्याचे आवाहन करण्यासाठी सूज्ञ नागरिक, महापालिका प्रशासन यांनीही पोलीसांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा >>> “आमचा जात जनगणनेला विरोध नाही”, देवेंद्र फडणवीसांचं विधान; म्हणाले, “एकाच घरातून…”
यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यास आणि कायद्याचे पालन करण्यासाठी महापालिका प्रशासनही पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. मिलिंद पटवर्धन, डॉ. रियाज मुजावर आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ उपस्थित होते.