धाराशिव : अपघातामुळे चेंदामेंदा झालेल्या चेहर्‍याला पुर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली चेहरा पुनर्निमाण शस्त्रक्रिया बेंगलोर येथील तज्ञांच्या मदतीने यशस्वी झाली आहे. आदलीच्या स्फोटात चेहर्‍याचा चेंदामेंदा झालेल्या बारा वर्षीय अक्षताच्या चेहर्‍यावर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरीय शहरात उपलब्ध असलेली प्रचंड महागडी शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यशस्वी करून दाखवली आहे.

वाशी तालुक्यातील पारा या ठिकाणी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणुकीनंतर ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यावेळी आदल्या वाजविण्यात आल्या. त्यातील एक आदली आडवी पडल्यामुळे बारा वर्षाची अक्षता भराटे आणि 35 वर्षीय महेश गवळी दोघांना गंभीर दुखापत झाली. आदली वाजल्यानंतर थेट अक्षताच्या चेहर्‍यावर जावून आदळली, त्यामुळे तिच्या डोळ्यापासून हनुवटीपर्यंत चेहर्‍याचा चेंदामेंदा झाला. तर महेश गवळी याच्या गळ्यावर या स्फोटाचा घात झाल्याने नरड्यातील रक्तवाहिन्या फुटल्या. घटनास्थळी प्रथमोपचार करून त्यांना वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखाल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. बालाजी भराटे यांनी दोघांवर प्रथमोपचार केले. रक्तस्त्राव होवू नये, म्हणून तुटलेल्या रक्तवाहिन्यांना टाके घालण्यात आले. अक्षताच्या चेहर्‍यावर मलमपट्टी केली, रक्तस्त्राव थांबविला आणि दोन्ही जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे पाठविले.

रूग्णांची अवस्था पाहून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी तातडीने सर्व अधिकार्‍यांना बोलावून शस्त्रक्रियेला सुरूवात केली. तातडीने महेश गवळीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान देशभरात ओ.एम.एफ.एस सर्जन म्हणून लौकिक असलेले डॉ. नितीन शर्मा धाराशिव शहरात त्यांच्या खाजगी कामानिमित्त आलेले होते. बेंगलोर, बेळगाव आणि सोलापूर या परिसरात वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ. नितीन शर्मा यांना वैद्यकीय महाविद्यालयाकडून सामाजिक दायित्व म्हणून मुलीच्या भविष्याचा विचार करता, निःशुल्क शस्त्रक्रिया करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यांनीही लहान मुलीच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करत, त्याला होकार दिला आणि धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने यशस्वीरित्या चेहरा पुनर्निर्माण शस्त्रक्रिया पूर्ण केली. महेश गवळी आणि अक्षता भराटे या दोघांचीही प्रकृती सध्या स्थीर आहे. अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील अक्षता हिच्या कुटुंबियांना करणे अशक्यप्राय होते. मात्र अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे गरीब कुटुंबातील अक्षताला वेळेत योग्य उपचार मिळाल्यामुळे आदलीच्या स्फोटात चेंदामेंदा झालेला चेहरा पुन्हा पुर्ववत करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाला यश आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. कृष्णा उंदरे, डॉ. नागेश वाघमारे, डॉ. बालाजी भराटे, डॉ. स्वप्नील उगले, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. शिंदे, डॉ. अनुभूती, डॉ. अंकूर, डॉ. ऐश्वर्या यांच्यासह परिचारिकांच्या मदतीने या शस्त्रक्रिया पार पडल्या.

लवकरच अक्षता ठीक होईल : अधिष्ठाता चौहान

आदलीच्या स्फोटामुळे जखमी झालेले दोन्ही रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी प्रयत्न सुरू केले. डॉ. शर्मा यांना विनंती केली. तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शविली. मुलीचे भविष्य ध्यानात घेवून सुरू केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले. रात्री 10 वाजता सुरू केलेली शस्त्रक्रिया पहाटे 3 वाजेपयर्ंंत सुरू होती. डोळ्यापासून हनुवटीपयर्ंत लहान मोठी 10 ते 12 हाडे तुटली होती. डॉ. शर्मा यांच्या मदतीने आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मोठ्या सचोटीने ही शस्त्रक्रिया पार पाडल्यामुळे रूग्णांना दिलासा देता आला, याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया डॉ. शैलेंद्र चौहान यांनी दिली.

Story img Loader