भाजपाशी हातमिळवणी केलेल्या प्रादेशिक पक्षांचा हळूहळू शेवट होतो, असा एक आरोप भाजपावर केला जातो. महाराष्ट्रबाहेरी राज्यात अशी उदाहरणे घडल्याचे राजकीय जाणकार सागंतात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला असून एकनाथ शिंदे यांना स्वतःहून बाजूला होण्यास भाग पाडले. यानिमित्त इतर राज्यात प्रादेशिक पक्षांचे जे झाले, तेच आता महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे झाले का? असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत सखोल विश्लेषण लोकसत्ता आयोजित विशेष चर्चेत करण्यात आले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर आणि संजीव साबडे हे या चर्चेत सहभागी झाले होते. ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास कसा होतो, याबद्दल संपादक गिरीश कुबेर यांनी माहिती दिली.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरवायला बरेच दिवस गेले. त्यातही मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? यावर चार दिवस खल झाला. याबद्दल संजीव साबडे यांनी सांगितले की, निकाल लागताच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यंमत्रीपदाला पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे भाजपा १३७ (अपक्ष मिळून) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) ४१ असे १७८ चे पक्के गणित तयार झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीबरोबर गेले नाहीत, तरी सरकार स्थापन होणारच होते. त्यापेक्षा सरकारबरोबर गेले तर निदान काही फायदे तरी पदरात पडू शकतात. या विचाराने शिंदे यांनी माघार घेतली.
पाहा व्हिडीओ –
ह
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले की, निकालानंतर भाजपाचे काँग्रेसीकरण झाल्याची शैली पाहायला मिळाली. पूर्वीची जुनी भाजपा असती तर आततायीपणे आम्ही आलोच, आमची सत्ता आली वैगरे असे केले असते. पण यावेळी भाजपाने असे काहीही केले नाही. अर्जुन सिंग यांच्या जगप्रसिद्ध ‘थंड करून खा’ या वाक्याप्रमाणे भाजपा बसून राहिला. एकनाथ शिंदेंशी कुणीही राज्य किंवा दिल्लीतून संपर्क साधला नाही. शेवटी परिस्थितीच अशी आली की, शिंदेंना स्वतःहून शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
हे वाचा >> अग्रलेख: आणखी एक गळाला…
देशभरात प्रादेशिक पक्षांची अशीच अवस्था
गिरीश कुबेर पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे तात्पुरते असे घडले असेल. पण राष्ट्रीय स्तरावर पंजाबचे अकाली दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, ओडिशामध्ये बिजू जनता दल, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचेही असेच झाले. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यानतंर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे होईल, असे दिसते. म्हणजे प्रेमाने गळ्यामध्ये घातलेला हात हा नंतर नंतर राजकीयदृष्ट्या गळफास कसा होतो, हे आतापर्यंत भाजपाने अनेकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे शिंदेंकडे माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
राजकीय विश्लेषक संजीव साबडे म्हणाले की, भाजपाला काँग्रेस पक्ष हळूहळू संपवायचा आहे. बाकीचे उरलेले प्रादेशिक पक्षही भाजपाला नको आहेत. भाजपाला दक्षिणेत हा प्रयोग करता येत नाही. पण उर्वरित राज्यात भाजपाने हे करून दाखवले आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांना फोडण्याचे काम भाजपाने केले. कारण राज्यात ताकद असलेला प्रादेशिक पक्ष टिकू द्यायचा नाही, हे त्यांचे धोरण आहे.